घरमुंबईमुख्यमंत्री दोन दिवसांसाठी 'अनऑफिशियल' सुटीवर; अचानक कुठे गेले एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री दोन दिवसांसाठी ‘अनऑफिशियल’ सुटीवर; अचानक कुठे गेले एकनाथ शिंदे

Subscribe

राज्यात सुरु असलेल्या सत्तापालटच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अनऑफिशियल सुटीवर गेल्याची माहिती आहे.

मुंबई – राज्यात पुढील ७२ तासांत वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात राज्यात होत असलेला हवामान बदल हा राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहे. सर्वकाही सुरळीत दिसत असेलल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्तापालटच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अनऑफिशियल सुटीवर गेल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असताना राज्यात मुख्यमंत्री बदलाचेही वारे वाहत आहे. त्यातच एकनाथ शिंदे सहकुटुंब त्यांच्या गावी सातारा जिल्ह्यात गेले असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या या अचानक सुटीवर जाण्याच्या चर्चांनी शिंदे गट आणि भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचेच समोर येत आहे.

शिंदे अनऑफिशियल सुटीवर?
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबिय २५ आणि २६ एप्रिल रोजी त्यांचे मुळ गावी सातारा जिल्ह्यात गेले आहेत. राज्यात राजकीय उलथापालथीची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांचा हा सातारा दौरा अनेकांना अचंबित करणारा आहे. एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे दोन दिवसांची अनऑफिशियल सुटी घेतली आहे. मुख्यमंत्री अनऑफिशियल सुटीवर (Unofficial Leave) गेल्याची अधिकृत माहिती नाही, मात्र सोमवारी (२४ एप्रिल) जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी साताऱ्याला जाणार असल्याचे आपल्या स्टाफला सांगितले आहे. मात्र त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर या दौऱ्याबाबतची कोणतीही माहिती नाही.

- Advertisement -

भाजपच्या खेळीवर शिंदे नाराज?
१६ मार्च रोजी राज्याच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची शिवसेना (उद्धव ठाकरे), तसेच शिंदे गटाला प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्यासोबतच राज्यातील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या निकालाकडे डोळे लावून आहे. दरम्यान शिंदेसह शिवसेनेत बंडखोरी केलेले १६ आमदार अपात्र ठरले, तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. यामुळेच एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे.

भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत पडद्याआड सुरु असलेली बातचीत शिंदेना खटकली आहे.
तसेच महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या १४ जणांच्या मृत्यूनेही शिंदे व्यथित आहेत. या मृत्यूसाठी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जबाबदार धरले आहे. तर, हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्याची योजना ही त्यांची नसल्याचेही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमुळे व्यथित झालेले एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सुटीवर साताऱ्यात गेले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -