घरमुंबईसहकारी पॉझिटिव्ह तरीही स्वतःची केली नाही कोरोनाची चाचणी

सहकारी पॉझिटिव्ह तरीही स्वतःची केली नाही कोरोनाची चाचणी

Subscribe

पालिका कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचू न देता धारावीसाठी दिघावकरांनी झोकून दिले

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात महापालिकेला आणि महापालिकेला सहकार्य करणार्‍या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी वरळी पॅटर्नचा गवगवा पालकमंत्र्यांनी काही प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन केला. परंतु पुढे असा कोणताही पॅटर्न नसल्याचे समोर आले. पण धारावीतील नियंत्रणात आलेल्या आजाराची नोंद खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने एकप्रकारे धारावीच्या कामगिरीबद्दल महापालिकेचे कौतुक केले.

या कौतुकाचे खरे हकदार आहेत ते जी-उत्तर विभागाचे सहायक आुयक्त किरण दिघावकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच स्थानिक संस्थांचे पदाधिकारी. आज धारावीचे कौतुक होत असले तरी एप्रिल आणि मे महिना आपल्या मुलाबाळांसह कुटुंबातील प्रत्येक सदस्यांपासून दूर राहून केलेल्या त्यागाचे हे यश आहे. आपल्यासमवेत सगळे पॉझिटिव्ह येत असताना, कुटुंबातील मंडळी चिंतेपायी कोरोनाची चाचणी करण्याची सूचना करत असतानाही दिघावकर यांनी आपली टेस्ट पॉझिटिव्ह येईल आणि आपल्याला क्वारंटाईन व्हावे लागेल. आपल्या खालच्या कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खचेल याचसाठी चाचणी न करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

धारावीमध्ये ज्याप्रकारे कोरोनाने थैमान घातले होते, ते चित्र पाहता इतर कुटुंबांप्रमाणे दिघावकर यांच्याही कुटुंबालाही त्यांची चिंता सतावत होती. यावर किरण दिघावकर म्हणतात, मला कधी टीव्ही बघायला वेळ नव्हता; पण घरचे टीव्हीवरील बातम्या पाहायचे. त्यात धारावीत, दादर-माहिममध्ये अमुक एवढे रुग्ण वाढल्याचे बातम्यांमध्ये पाहिल्यानंतर त्यांना चिंता वाटायची. त्यामुळे पीपीई किट घालूनच काम करत जा, असे घरचे सांगायचे. कधी माझ्या संपर्कातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचे जेव्हा कळायचे तेव्हा घरचे कोरोनाची चाचणी करण्याचा आग्रह धरायचे. पण जोवर काही होत नाही तोवर काही करण्यात अर्थ नाही,असे मला वाटत होते.

उगाच लक्षणे नसलेला पॉझिटिव्ह बनून घरी राहण्यापेक्षा हे नको करायला, असे माझे मन सांगत होते. त्यामुळे एकदा-दोनदा घरच्यांनी सांगून बघितले. पण मी काही लक्ष दिले नाही. कर्मचार्‍यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी धारावीत मुद्दाम जावे लागायचे. मी मुद्दाम क्वारंटाइन सेंटरला भेट द्यायचो. तसेच मुद्दाम इंजिनिअर्ससोबत जाऊन पाहणी करून यायचो. तसेच कुठे टेस्ट चालू असतील तर तिथेही जायचो. म्हणजे त्यांनाही असे नको वाटायला की केबिनमध्ये बसून सूचना देतो आणि आपण ग्राऊंडवर काम करतो.

- Advertisement -

तब्बल दोन महिने धारावीत कोरोनात थैमान घातलेले असताना हा योध्दा आपल्या सैनिकांसह तिथे लढत होता. पण त्यांनी कधीही कोरोना टेस्ट केली नाही. ते म्हणतात, मी अजूनही टेस्ट केलेली नाही. माझ्या संपर्कात आलेले बरेच लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते. परंतु म्हटले की, जर आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल आणि क्वारंटाईन झाल्यास कामाचे काय होणार हा प्रश्न होता. आणि दुसरे असे की लक्षणे नाही तर उगाच करण्याचे कारण काय असा प्रश्न होता. जर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला असता तर माझ्या लोकांवर मानसिक दडपण आले असते, जे माझ्या हाताखाली काम करतात. त्यावेळी एप्रिल व मे महिना खूपच धोकादायक होता धारावीमधला. आणि त्यामध्ये जर वॉर्ड ऑफिसरच पॉझिटिव्ह झाला असता तर बाकीच्यांचे मनोधैर्य खचले असते. त्याच विचारामुळे मी कोरोनाची टेस्ट केली नाही. लक्षणे नसल्याने आपण काम करत राहू, असेच ठरवले होते.

इतरांप्रमाणे दिघावकर यांनाही कोरोनाची भीती वाटत होती. तेव्हातर ते घाबरुनही गेले होते. याबाबत ते सांगतात की, एप्रिल महिना खूपच तणावाचा होता.विशेषत: जेव्हा धारावीत अन्न वाटप करणारे करनिर्धारण व संकलन विभागाचे निरीक्षक मधुकर हरियाण यांचा मृत्यू झाला होता, त्यावेळी तर आमचा आत्मविश्वास निघूनच गेला होता. तेव्हा घाबरले होते सगळे. आणि एकदा तेव्हा आणि दुसरे १४ दिवसांकरता सगळे निरीक्षक क्वारंटाईन झाले होते तेव्हा. त्यानंतर आम्ही. ‘जी- नॉर्थ’मधील धारावीत काम करणार्‍या इंजिनिअर्सपासून ३५ लोकांची चाचणी केली. यात त्यांच्यापैकी २१ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. आणि तेव्हा आम्ही थोडे घाबरलो होतो. आता काही खरे नाही म्हणून असे वाटू लागले; पण नंतर हळूहळू आपल्यालापण अ‍ॅक्टिंग करत राहावी लागते. कारण आपणच घाबरलोय असे दाखवले तर खालची लोकं काम करणार नाही. त्यावेळी धारावीत कोरोना रुग्णांचा भर सुरू होता आणि कुणी काम करायला तयार होत नव्हता. म्हणजे कॉन्ट्रक्टरपासून ते कुणीच तयार होत नसत. अशा परिस्थितीत आत्मविश्वास आहे तसा दाखवणे गरजेचे होते.

किरण दिघावकर हे महापालिकेत २००६ मध्ये अभियंता म्हणून कार्यरत झाले. रस्ते विभागात ते कार्यरत असताना २०११मध्ये सहायक आयुक्तांच्या पदाकरता जी एमपीएससीची परीक्षा झाली, त्यात ते सहायक आयुक्तपदी विराजमान झाले. कोरोनाचा धोका हा जसा वयोवृध्दांना असतो, तसेच दहा वर्षांखालील मुलांनाही असतो. दिघावकर यांनाही दोन मुले असून एक मुलगा पहिलीत आणि दुसरा मुलगा पाचवीत आहे. त्यामुळे दिवसभर कोरोनाशी लढून घरी गेल्यानंतर त्यांना आपल्या मुलांनाही प्रेमाने जवळ घेता येत नव्हते. मुलांशी लांबूनच ते संवाद साधायचे. ते म्हणतात, तसे मी एप्रिल व मे महिन्यामध्ये घरी सोशल डिस्टन्सिंग राखूनच राहायचो. मुलांपासून थोडा दूर. वेगळ्याच खोलीत झोपायचो. सकाळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण करताना टेबलवर जो काही कुटुंबाशी संवाद व्हायचा तो.

परंतु जूनमध्ये हे प्रमाण कमी झाल्यानंतर मग कुटुबांमध्ये मिसळू लागलो. तरी विशेष काळजी घेत असतो. या कालावधीत मला तेव्हा चालण्यापुरता दीड तासांचा वेळ मिळायचा तेवढाच. बाकी मग ऑफिसला आल्यानंतर जे फोन खणखणायचे ते रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत. दिवसभर फोन वाजायचे. अशा काहीशा घटना घडल्या आहेत की एखाद्या महिलेने माझ्या पतीची तब्येत फारच बिघडली. तात्काळ बेड उपलब्ध करून द्या, म्हणून विनंती करायची आणि त्यानंतर दोन ते तीन तासांनी आम्ही फोन करायचो ते गेले, असे कळायचे. पण पुढे पुढे आमच्याही भावना मरत गेल्या आणि दुसर्‍या कुणाला बेड हवाय ते पहा म्हणून सांगायचो. विभाग कार्यालयात वॉर रुम तयार झाल्यानंतर आता थोडेसे रिलॅक्स मेंटेन होत आहे, असे ते म्हणतात.

आज धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि जी-उत्तर विभागातील प्रत्येक कर्मचार्‍यांचे योगदान आहे. परंतु याबरोबरच खारीचा वाटा उचलला आहे तो मोठ्या स्वयंसेवी संस्थांबरोबरच स्थानिक संस्था आणि मंडळांनी. तेथील छोट्यात छोटी मंडळे, संस्था, खासगी डॉक्टर यांच्यासह खासदार, आमदार मंत्री, नगरसेवक तसेच विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व रहिवाशी यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य आणि दिलेला पाठिंबा यामुळेच धारावीतील कोरोनाला नियंत्रणात आणता आला असे म्हणेन,असे दिघावकर सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -