घरमुंबईबोरीवली, दहिसर, मालाड, कांदिवली, भांडूप, मुलुंडमध्ये 'मिशन झिरो'

बोरीवली, दहिसर, मालाड, कांदिवली, भांडूप, मुलुंडमध्ये ‘मिशन झिरो’

Subscribe

मुंबई शहरात करोना नियंत्रणात

करोना विषाणू विरुद्धच्या युद्धामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांना यश येत असून मुंबईतील रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी आता ३६ दिवसांवर गेला आहे. असे असले तरी काही भागांमधील रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम (रॅपिड अ‍ॅक्शन प्लॅन) राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे. यासाठी ‘मिशन झिरो’अर्थात शून्य करोना रुग्ण लक्ष्य गाठण्याचा उपक्रम निश्चित करून याची सुरुवात बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली, भांडूप, मुलुंड भागांपासून केली जाणार आहे.

उत्तर व ईशान्य मुंबईत ५० फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करून बाधितांचा शोध घेणार आहेत. २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये चालणार्‍या या शीघ्र कृती कार्यक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या उपक्रमाचा आरंभ अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातून रविवारी करण्यात आला आहे. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावरील हा उपक्रम मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, एमसीएचआय – क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष नयन शाह, माजी अध्यक्ष धर्मेश जैन, उपाध्यक्ष नैनेष शाह, तसेच देश अपनाये, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन इत्यादी संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

रुग्ण दुपटीचा सध्याचा ३६ दिवसांचा सरासरी कालावधी आता ५० दिवसांपर्यंत नेऊन पुढे आणखी वाढविण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष्य आहे. मात्र मालाड (पी/उत्तर), बोरिवली (आर/मध्य विभाग), दहिसर (आर/उत्तर विभाग), कांदिवली (आर/दक्षिण विभाग), भांडूप (एस विभाग), मुलुंड (टी विभाग) आदी परिसरांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा मुंबई महानगराच्या सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी असून तेथे संसर्ग अद्याप वाढत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या भागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम मिशन झिरो अंतर्गत शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी डॉक्टर्स व औषधांसह ५० फिरत्या दवाखान्यांची वाहने जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करतील. त्यांना औषधेही दिली जातील. २ ते ३ आठवडे युद्ध पातळीवर हे कामकाज करून या भागातील रुग्णांची तपासणी केली जाईल. यातूनच करोना संशयित रुग्णांना त्वरित वेगळे करून त्याच परिसरात ताबडतोब त्यांची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाणार आहे. बाधितांचा वेळीच शोध, उपचार करण्यात येतील. नागरिकांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविणे इत्यादी बाबतीत जनजागृती देखील करण्यात येणार आहे.

सव्वा चार लाख रुग्णांची तपासणी
मागील ५० दिवसांमध्ये मुंबई व उपनगरात ४ लाख २८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोबाईल डिस्पेंसरी सेवेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नामुळेच रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. यामध्ये धारावी व वरळीचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -