Nisarga Cyclone: मुंबईत दिवसभरात १९६ झाडांची पडझड, ३९ शॉट सर्किटचे प्रकार

मुंबईला निसर्ग वादळाचा थेट फटका बसलेला नाही. काही ठिकाणी वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही.

CYCLONE DADAR 3 JUNE 2020 1
मुंबईत ज्या ठिकाणी झाड कोसळले त्याचा भाग लगेचच बाजुला करताना महापालिकेचे कर्मचारी.. (फोटो - दीपक साळवी)

मंगळवारपासून आगमन झालेल्या पावसाची संततधार बुधवारीही कायमच होती. निसर्ग चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता महापालिकेसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आधीच मानव निर्मित आपत्तीचा सामना मुंबईसह राज्य करत असतानाच ही नैसर्गिक आपत्तीच्या विचाराने सर्व घाबरुन गेले होते. परंतु निसर्गाने मुंबईवर मेहरबानी करत चक्रीवादळाचा मार्ग बदलला आणि मोठी नैसर्गिक आपत्तीचा धोका टळला. पावसाची संततधार सुरुच असली तरी कुठेही पाणी साचण्याचे प्रकार घडले नाहीत. मात्र, वादळी वाऱ्यामुळे दिवसभरात १९६ झाडांची पडझड झाली तर घरे पडण्याची तथा भिंत पडण्याच्या ९ घटना घडल्या. तर शॉट सर्किटच्या ३९ घटना मुंबईत घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

संध्याकाळपर्यंत शहरात ४६.७ मि.मी तर उपनगरांमध्ये २२.४ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. मात्र पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यत आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

वादळीवाऱ्यामुळे १९६ झाडांची पडझड

मुंबईत बुधवारी पहाटेपासून वादळी वाऱ्यामुळे झाडे तसेच फांद्या तुटून पडण्याच्या ५७ घटना शहर आणि उपनगरांमध्ये घडल्या आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत झाडांच्या फांद्या किंवा वृक्ष उन्मळून पडण्याच्या २५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु संध्याकाळपर्यंत एकूण ३९ झाडे शहरात पडली होती. तर पूर्व उपनगरांमध्ये संध्याकाळपर्यंत ४० आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३८ झाडांची पडझड झाली होती. त्यामुळे शहर आणि उपनगरांमध्ये एकूण १९८ झाडांची पडझड झाली होती. परंतु यामध्ये कुणालाही मार लागला नसून कुठल्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

मुंबईत ९ ठिकाणी घर, प्लास्टर पडण्याच्या दुघर्टना

मुंबईत वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात ३, पश्चिम उपनगरांत ४ आणि पूर्व उपनगरांत २ अशा एकूण ९ ठिकाणी घराचा तसेच भिंतीचा प्लास्टरचा भाग पडण्याच्या दुघर्टना घडल्या आहेत. मात्र, यामध्ये कुणालाही मार लागलेला नाही.

मुंबईत ३९ शॉर्ट सर्कीटचे प्रकार

वादळी वारे आणि पाऊस यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून दिवसभरात अशाप्रकारच्या ३९ घटनांच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये शहरात १९ आणि उपनगरांत २० घटनांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही.

५ हजार डोळयांनी मुंबईवर नजर

महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्ष फक्त चक्रीवादळासंदर्भातील व्यवस्थापन करण्याकरीता स्थापन करण्यात आला. याठिकाणी सर्व यंत्रणा म्हणजेच पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, उद्यान विभाग, जनसंपर्क विभाग यांचे प्रतिनिधी समन्वयासाठी उपस्थित होते. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारापेक्षा अधिक कॅमेरांच्या माध्यमातून घडामोडींवर नजर ठेवून होते. या नियंत्रण कक्षात सकाळी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल हे नियंत्रण कक्षात बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी आपत्कालिन विभागाचे सल्लागार महेश नार्वेकर, सहआयुक्त मिलिन सावंत आदी उपस्थित होते.

महापौरांनी घेतला चौपाटींचा आढावा

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरीन लाईन्स चौपाटी, गिरगाव चौपाटी, माहीम चौपाटी, वर्सोवा चौपाटी, जुहू चौपाटी तसेच वरळी चौपाटीला भेट देऊन तेथील सद्यस्थितीचा तसेच उपाययोजनांचा आढावा उप आयुक्त तथा प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्यासोबत घेतला. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याने त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला. त्यानंतर महापौरांनी परळ येथील नियंत्रण कक्षात जावून मुंबईतील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.

सुमारे १९ हजार नागरिकांचे स्थलांतर

संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ३५ ठिकाणी तात्पुरती निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा खुल्या करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळपर्यंत समुद्र किनाऱ्यालगतच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या १८ हजार ८८७ नागरिकांना या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती. नागरिकांनी स्थलांतर करावे म्हणून जागोजागी आवाहन करण्यात येत होते. स्थलांतरीत नागरिकांसाठी निवाऱ्यासह जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मिठी नदीसह दरड कोसळण्याच्या ठिकाणांवरील डोंगराळ भागातील लोकांनाही स्थलांतरीत करण्यात आले होते.

आरोग्य तपासणी करून स्थलांतरीतांना घरी पाठवणार

चक्रीवादळ ओसरल्यानंतर घरी परतण्यापूवी या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार यासर्वांची आरेाग्य तपासणी करूनच त्यांना घरी पाठवण्याचे नियेाजन महापालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या नागरिकांमध्ये कोरोना बाधित असल्याची साधारण लक्षणे आढळून येतील अशा नागरिकांना सीसीसी-२ मध्ये पाठवण्यात येईल. तर ज्या नागरिकांमध्ये कोणतीही लक्षणे नाही अशांना वैद्यकीय तपासणीनंतरच गुरुवारी घरी जावू दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बीकेसीतील २१२ रुग्ण वरळीतील एनआयसीआयमध्ये स्थलांतरीत

वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदानावर उभारलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्र या जम्बो फॅसिलिटीमध्ये असलेल्या २१२ रुग्णांना वरळी येथील एनएससीआय कोविड जम्बो फॅसिलिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. बीकेसीतील कोविड केंद्र हे सुमारे १०५ किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्याचा सामना करु शकते. मात्र चक्रीवादळात १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज असल्याने हा धोका लक्षात घेता या रूग्णांना वरळी येथे स्थलांतरित केले आहे, अशी माहितीदेखील आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

आयुक्त ऑन फिल्ड

चक्रीवादळासंदर्भात नियंत्रण कक्षात जावून आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी खान अब्दुल गफारखान मार्गावरील वरळी सी फेस परिसराची पाहणी केली. त्यानंतर बेझंट मार्गावरील पंपिंग स्टेशन येथील नाल्याची व लगतच्या परिसराची पाहणी केली. या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी बीकेसी मेट्रो रेल्वे लगत महापालिकेने उभारलेल्या फ्लड गेटच्या कामाची पाहणी केली. संततधार पावसात होत असलेल्या या पाहणी दौऱ्याला महापालिका आयुक्तांसह भेट अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू, संबंधित सहायक आयुक्त, महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.