घरमुंबईCyclone Tauktae: चक्रीवादळामुळे मुंबईत घरांच्या पडझडीच्या दुर्घटना; ८ जण जखमी

Cyclone Tauktae: चक्रीवादळामुळे मुंबईत घरांच्या पडझडीच्या दुर्घटना; ८ जण जखमी

Subscribe

शहर आणि उपनगरामध्ये २६ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या दुर्घटना सोमवारी घडल्या.

मुंबईत तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात शहर आणि उपनगरामध्ये २६ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या दुर्घटना सोमवारी घडल्या. यामध्ये शहर भागात १५ ठिकाणी, पश्चिम उपनगरात ८ ठिकाणी, तर पूर्व उपनगरात ३ ठिकाणी घरांच्या पडझडीच्या दुर्घटनांचा समावेश होता. दोन ठिकाणी घराच्या आणि एका ठिकाणी क्रेन घरावर पडल्याच्या दुर्घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, बोरिवली (पूर्व) येथे अभिनव नगर, एसआरए, काजूपाडा, साईदृष्टी इमारत येथे एक क्रेन घरावर पडल्याने एकाच कुटुंबातील कुंदा सकपाळ (४०), सागर सकपाळ (२५) आणि देवयानी सकपाळ असे तिघे जण जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.

दुसरी घटना अंधेरी (प.), युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेट, गणेश नगर सोसायटी, राज पॅलेस येथे खोली क्रमांक १८ (तळमजला अधिक एक) चे बांधकाम अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच चेंबूर, सुमननगर चिखलवाडी, प्रियदर्शनी इमारत येथे एका घराचे दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंतीचा भाग अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आश्रय माळी (२१), सुदर्शन माळी (२३), आकाश माळी (२६) आणि सागर माळी (२२) असे चार जण जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

समुद्रात बोट फुटल्याने ४ जण बेपत्ता

मुंबईत चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मढ आणि माहीम येथील समुद्रात अँकर लावलेली बोट फुटून झालेल्या दुर्घटनेत ६ जण कसेबसे बचावले, तर ४ जण बेपत्ता आहेत. मढ येथे समुद्रात अँकर लावलेली बोट फुटून ५ जण खवळलेल्या समुद्रात अडकले होते. त्यापैकी ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून एक जण बेपत्ता आहे. सायंकाळी उशिरपर्यंत शोध घेऊनही तो न सापडल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पुढील शोधकार्य थांबविण्यात आले. दुसरी घटना माहीम येथे घडली. माहीम , रेतीबंदर येथील समुद्रात अँकर तुटून बोट समुद्रात गेली. या दुर्घटनेत ५ जण अडकले होते. त्यापैकी २ जण पोहत सुखरूपपणे बाहेर आले. तर १ जण बुडाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतर २.जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -