Cyclone Tauktae Mumbai : मुंबईकरांनो भरतीची वेळ वाचा, रायगडला RED ALERT

mumbai monssoon

तोक्ते चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने सरकतानाच त्याचा परिणाम हा मुंबई शहर आणि उपनगरातही जाणवत आहे. मुंबईत ताशी १०२ किमी प्रति तास या वेगाने वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत सकाळपासूनच जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने शहर आणि उपनगरात अशी चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड होतानाच, काही ठिकाणी नुकसानही झाले आहे. पण मुंबई महापालिकेकडून मात्र आजच्या दिवसातील भरतीची वेळ आणि सर्वात मोठी लाट किती उंचीची असेल याबाबतची माहिती देऊ केली आहे. त्यामुळे या उंच लाटांदरम्यान आणि भरतीच्या वेळेत पाऊस पडत राहिला तर मुंबईकरांच्या आणि संपुर्ण यंत्रणांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Cyclone Tauktae Mumbai, afternoon High tide in mumbai may add problems for MCGM)

मुंबईत आज सकाळी ११.३० पर्यंत ७९.४ मिमी इतकी पावसाची नोंद कुलाबा वेधशाळा येथे झाली. तर सांताक्रुझ येथे ४४.५ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम म्हणजे अतिशय वेगाने असे ताशी १०२ किमी इतका पावसाचा वेग होता. त्यासोबतच पावसाच्या हजेरीने अनेक ठिकाणी झाडांची पडझड तसेच काही ठिकाणी घरांचे नुकसानही झाल्याची पालिकेची माहिती आहे. येत्या ४८ तासांमध्ये मात्र हा वाऱ्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

तोक्ते चक्रीवादळ गुजरातला धडकरणार

तोक्ते चक्रीवादळ आता अतिशय शक्तीशाली असे रूप धारण केले असून हे वादळ मुंबईपासून पश्चिमेला १२० किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली. आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. आज सोमवारी रात्री ८ ते ११ या कालावधीत हे चक्रीवादळ गुजरातला धडकेल अशीही माहिती त्यांनी दिली. कुलाबा येथे १०२ किमी वेगाने वारे नोंदवण्यात आले आहेत. रायगडसाठी रेड अलर्ट येत्या २४ तासांमध्ये मुंबईतही काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांमध्ये वादळाचा वेग कमी होईल. तर या कालावधीत काही ठिकाणी पावसाचीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

भरतीची आणि सर्वात उंच लाटेचे अपडेट काय ?

मुंबईत दुपारी ३.४४ वाजता भरतीची वेळ आहे. त्यामुळे या कालावधीत पावसाचा जोर असाच कायम राहिल तर यंत्रणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या भरतीच्या कालावधीत सर्वात उंच लाट ही ३.९४ मीटर उंचीची असेल. तर ओहोटीची वेळ ९.४२ वाजता असणार आहे. ओहोटीच्या वेळेत लाटांची उंची २.१९ मीटर इतकी असेल.