घरमुंबईगतिमंद मुलाची पिंपात बुडवून हत्या; मारेकरी पित्याची सुद्धा आत्महत्या!

गतिमंद मुलाची पिंपात बुडवून हत्या; मारेकरी पित्याची सुद्धा आत्महत्या!

Subscribe

मुलुंडमधील धक्कादायक प्रकार

धान्य साठवण्याच्या पिंपात पाणी भरून त्यात गतिमंद असलेल्या मुलाला बुडवून त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या करणार्‍या वडिलांनी देखील गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुलुंड पश्चिम येथे उघडकीस आली आहे. या घटनेने मुलुंडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. मुलाच्या भविष्याच्या चिंतेतून ही घटना घडली असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दशरथ भट्ट (65) असे वडिलांचे नाव असून योगेश भट्ट (35) असे मुलाचे नाव आहे. दशरथ हे पत्नी आणि मुलगा योगेश सोबत मुलुंड पश्चिम क्राऊन योगी हिल्स या ठिकाणी राहण्यास होते. दशरथ यांना 3 मुली असून तिघींचा विवाह झाला असून त्या सासरी राहण्यास आहे. योगेश हा लहानपणापासून गतिमंद असल्यामुळे आपल्या नंतर मुलाचे कसे होणार याची चिंता वडील दशरथ यांना लागली होती.

- Advertisement -

शनिवारी रात्री दशरथ हे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम घेऊन घरी आले. पत्नी आणि मुलाला त्यांनी आईस्क्रीममधून गुंगीचे औषध देऊन खाण्यास दिले. मध्यरात्री दशरथ हे झोपेतून जागे झाले व त्यांनी पत्नी आणि मुलगा गाढ झोपेत असल्याचे बघून धान्य साठवतात तो पिंप बाहेर काढून त्यातील धान्य बाहेर काढले व पिंपात पाणी भरून गतिमंद मुलगा योगेश याला पिंपात बुडवून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वतः बेडरूममध्ये असलेल्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. सकाळी पत्नीला शुद्ध येताच घरातील दृश्य बघून तिने आरडाओरड करून शेजार्‍यांना मदतीसाठी बोलावून घेतले.

या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आली असून त्यात वडिलांनी मुलाच्या आजारावर लिहिले आहे. ‘माझ्या नंतर त्याचे पुढे काय होणार या चिंतेतून मी त्याची हत्या करून स्वतः आयुष्य संपवत आहे,’ अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी दिली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अपमृत्युची नोंद करण्यात आली असल्याचे भिसे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -