Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई प्रदीप शर्मा- सुनील मानेची समोरासमोर होणार चौकशी

प्रदीप शर्मा- सुनील मानेची समोरासमोर होणार चौकशी

Related Story

- Advertisement -

अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील मानेचा न्यायालयातून ताबा घेऊन संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोन आरोपीसोबत एनआयए विशेष न्यायालयात सोमवारी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांना 25 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. आता एनआयएकडून प्रदीप शर्मासह इतर चार आरोपी आणि सुनील माने याला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने सुनील मानेकडे चौकशी करायचे असल्याचे सांगून न्यायालयाकडून ताबा मागितला होता. सोमवारी सुनील मानेला तळोजा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान 11 जून रोजी अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांची एनआयए कोठडी सोमवारी संपल्यानंतर या दोघांना सुनील मानेसह न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे.

- Advertisement -

या दोघांनी मनसुख यांचे दोन्ही हात पकडून गळा आवळून हत्या केल्याचे चौकशीत आरोपींनी माहिती दिली असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी असून त्यांना देखील अटक करायची असून दोन्ही आरोपींना दहा दिवसांची एनआयए कोठडीची मागणी एनआयएने न्यायालयात केली. सुनील माने यांनी एनआयए कोठडी असताना चौकशीत दिलेली माहिती आणि नुकतीच अटक करण्यात आलेल्या प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींनी केलेले कथन किती खरे आहे हे पडताळून बघण्यासाठी सुनील माने याला प्रदीप शर्मासह इतर आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याची एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान प्रदीप शर्मा यांनी मला वकिलाला रोज भेटण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात केला होता, न्यायालयाने या अर्जावर सुनावणी देत शर्मा यांना वकिलांना 12 ते 12.20 या वेळातच दररोज केवळ 20 मिनिटे भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात आणखी एका अधिकारी आणि दोन अंमलदार एनआयएच्या रडारवर असून कुठल्याही क्षणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -