घरमुंबईफिल्मसिटीमध्ये सेट पुरविणार्‍या कॉन्ट्रक्टरकडे खंडणीची मागणी

फिल्मसिटीमध्ये सेट पुरविणार्‍या कॉन्ट्रक्टरकडे खंडणीची मागणी

Subscribe

शिवा शेट्टीचा सहकार्‍याला अटक; आरे पोलिसांकडे ताबा

फिल्मसिटीमध्ये सेट पुरविण्याच्या कंत्राटावरुन एका कॉन्ट्रक्टरला खंडणीसाठी धमकावून त्याच्या मराठी मालिकाच्या सेटवर तोडफोड केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या शिवा शेट्टीचा खास सहकारी अक्षय शिवा पाटील याला गुरुवारी नाशिक येथून गुन्हे शाखेच्या अटक केली. अक्षयवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी आरे पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांनी सांगितले. गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये मराठी मालिकांसह काही हिंदी चित्रपटाचे शूटींगचे काम चालते. त्यासाठी कंत्राट मिळविण्यासाठी दोन गटामध्ये स्पर्धा आहे. यातील एका गटाला एका मराठी मालिकेसाठी कंत्राट मिळाले होते. ते कंत्राट शिवा शेट्टी याच्या ग्रुपला मिळाले नाही म्हणून त्यांच्यात वाद सुरु होता. याच वादातून शिवा शेट्टीने तक्रारदार कॉन्ट्रक्टरकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला होता.

याच कारणावरुन 8 जुलै 2019 रोजी शिवा शेट्टीच्या सहकार्‍यांनी या सेटवर घुसून शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने तिथे उपस्थितांना मारहाण केली. तसेच संपूर्ण सेटचे नुकसान केले होते. मालिकेचे काम सुरु ठेवण्यासाठी शिवा शेट्टीने तक्रारदाराकडे खंडणीची मागणी केली होती. या घटनेनंतर शिवा शेट्टीसह त्याच्या इतर सहकार्‍यांविरुद्ध आरे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह खंडणी व अन्य भादवी तसेच मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर शिवा शेट्टीसह इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याचा खास सहकारी अक्षय पाटील हा या घटनेनंतर पळून गेला होता. त्याचा आरे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच अक्षय हा नाशिक येथील सिन्नर परिसरात राहत असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील सागर शिवलकर, अतुल आव्हाड, कृष्णकांत कदम, मुरलीधर कारंडे, दिनेश राणे, संतोष बने, राजेश सावंत, सचिन जाधव यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून अक्षयला अटक केली. अक्षय हा बोरिवलीतील एल. टी रोडवरील निलम हॉटेलसमोरील गौरीनगरचा रहिवाशी आहे. तो शिवा शेट्टीचा जवळचा सहकारी असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध आरे, बोरिवली आणि एमएचबी पोलीस ठाण्यात सहाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी आरे पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -