घरमुंबईएड्सग्रस्त मुलांचा निर्धार; जनजागृतीला दिला आधार!

एड्सग्रस्त मुलांचा निर्धार; जनजागृतीला दिला आधार!

Subscribe

एड्सग्रस्त मुलंच आपला अनुभव सांगून या आजाराबाबत जनजागृतीचे कार्य करणार आहेत. समाजात या आजारासाठी असलेली भावना बदलण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे हा उपक्रम राबवला जाणार आहे.

एड्सच्या आजारामुळे आजही रुग्ण समाजात वावरताना भीती अनुभवतात. प्रत्येक एड्सच्या रुग्णाला त्याच्या रोगामुळे समाजाच्या संपर्कात येण्याची भीती वाटते. ‘एड्स’ या आजाराची जागरुकता ही काळाची गरज आहे. त्यामुळेच ‘मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी’ (एमडॅक्स) एड्सग्रस्त मुलांकडून शिक्षण, माहिती आणि जनजागृतीसाठी मदत घेत आहे. ‘चिल्ड्रन अफेक्टेड बाय एड्स’ (काबा) ही मुलं आपल्या अनुभवातून एड्स झालेल्या इतर मुलांसाठी जनजागृतीचं काम करत आहेत. ‘मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी’तर्फे मिळालेल्या माहितीनुसार, आतार्यंत २४ हजार ३०४ मुलं एचआयव्ही ग्रस्त आहेत. त्यातील २ हजार ६०५ सीएलएचआयव्ही रुग्ण आढळले आहेत. तर १९ हजार ४०० म्हणजेच ८० टक्के अफेक्टेड मुलं एआरटी उपचार घेत आहेत. शिवाय २ हजार २९९ मुलांचे एचआयव्ही स्टेटस समजू शकलेले नाही.

‘हॅप्पी फिट होम’चा आधार 

वयाच्या १२ व्या वर्षी एचआयव्ही असल्याचं मला समजलं. फक्त हा आजार आहे एवढंच माहित होतं. मात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर समजलं मला एचआयव्ही आहे. ज्याच्यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागणार आहेत. माझ्या वडीलांचा मृत्यूदेखील याच आजारामुळे आणि आमच्या डोळ्यासमोर झाला होता. तेव्हा ते खूप बारीक झाले होते. कारण, त्यांना माहितंच नव्हतं की नेमकं काय आजार झाला आहे. तेव्हापासून या आजाराबाबत खूप भीती होती. वडीलांपासून आपल्याला हा आजार झाला आहे हे जेव्हा समजलं. तेव्हा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. खूप राग आला होता. डिप्रेशनमध्ये गेले होते. पण, जसजशी ‘हॅप्पी फिट होम’मध्ये येण्यास सुरूवात केली. तेव्हा ही भीती थोडी कमी झाली आणि नंतर वाटू लागलं की हा आजार माझ्या इच्छा शक्तीपेक्षा मोठा नाही. आता तर मी खूप विश्वासाने सांगते की, मला एचआयव्ही आहे. वयाच्या १२ व्या वर्षांपासून एचआयव्हीसोबत आयुष्य जगणाऱ्या प्रियाने (बदलेलेलं नाव) हे मत मांडले.

- Advertisement -

१७ वर्षांपासून आजाराशी लढा

प्रिया गेली १७ वर्षे एचआयव्हीसोबत सकारात्मक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. आजही एचआयव्ही झालेल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन तितकासा चांगला झालेला नाही. समाज अशा लोकांना स्विकारत नाही. त्यापैकी एक गट असाही आहे, ज्यात त्यांची काहीच चूक नसताना ते या आजाराचे बळी झाले आहेत. तो गट म्हणजे आई-वडिलांपासून मुलांना होणारा एचआयव्ही. अशा मुलांसाठी लहानपणापासूनच एचआयव्हीसोबत जगणं खूप कठीण होऊन जातं. कारण, ज्या वेळेस त्यांना खऱ्या आधाराची गरज असते, तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नसतं. अशाच परिस्थितीत ही मुलं आपलं आयुष्य जगतात.

बाल वयातच लैंगिक शिक्षण द्यावे

असाच अनुभव वयाच्या ९ व्या वर्षी अमिन सय्यद (बदलेलेलं नाव) यालाही आला. आपले मित्र आपल्याला एचआयव्ही असल्यामुळे सोडून गेले. आपल्याला चिडवण्यास सुरूवात केली. त्याचं कारण होतं, एचआयव्ही. या परिस्थितीत एचआयव्ही म्हणजे काय? हे माहितही नव्हतं. शेजाऱ्यांना माझ्या आजारबाबत समजल्यानंतर त्यांनीही मला वाईक वागणूक दिली. ही आठवण सांगताना १८ वर्षीय सय्यद लहानपणापासूनच मुलांना लैंगिक शिक्षण देणे आवश्यक असल्याचा सल्ला देतो. ज्यामुळे एचआयव्ही रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन लहानपणापासूनच बदलेल. आजही लोकांमध्ये एचआयव्हीबद्दल जनजागृती नाही. त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याची गरज सय्यद ‘आपलं महानगर’कडे व्यक्त करतो.

१२ वर्षांनंतरची मुलं समजूतदार असतात. त्यामुळे आम्ही त्यांनाच आणखी काय बदल करता येतील यासाठी सल्ले मागवून घेतो. ज्यामुळे समाजात एचआयव्हीबाबत असणारे गैरसमज दूर होण्यासाठी मदत होते. या मुलांच्या काळजीसोबतच त्यांना एचआयव्हीसंबंधीचे शिक्षण देणं देखील महत्त्वाचं आहे. शिवाय, मुलांकडूनच काही चित्रं तयार करून घेतली जातात. वेगवेगळे वर्कशॉप घेतात. मुलांना गोळ्या घेण्यासाठीही सतत सांगावं लागतं. त्यामुळे काही स्टोरीज तयार केल्या जातात. त्यांना गोळ्या घेण्याचं मार्गदर्शन मिळतं
– डॉ. श्रीकला आचार्य, अॅडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी

- Advertisement -

काबाकडून समुपदेशन केले जाते 

आई-वडिलांपासून मुलांना एचआयव्ही होण्याचं प्रमाण आता कमी झाले आहे. प्रिया आणि सय्यदसारख्या अनेक एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी गेली कित्येक वर्ष मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीत काम करत आहेत. या मुलांना आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगता येईल, यासाठी मार्गदर्शन केलं जातं. काही सामाजिक संस्थाही या कामात पुढाकार घेतात. शिवाय, ‘मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी’त एचआयव्ही झालेल्या मुलांकडून आणखी काय करता येईल, त्यासाठी सल्ला मसलत ही घेतली जाते. ज्यामुळे माहिती, शिक्षण आणि संवाद यातून या ‘चिल्ड्रन अफेक्टेड बाय एड्स’ (काबा) म्हणजेच आई-वडिलांमुळे एचआयव्ही झालेल्या मुलांचं समुपदेशन करणं सोपं होईल.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -