मुंबई : उद्धव ठाकरेंपासून आम्ही मनाने दूर गेलो आहोत. ते आम्हाला मित्र मानतात का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. आमच्या नेतृत्वाला सतत शिव्या घालणाऱ्या व्यक्तींसोबत आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकू असं वाटत नाही, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याशी आमचे आधीपासून चांगले संबंध होते. माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं होतं. मोठ्या प्रकल्पांवर आम्ही एकत्र काम केलंय. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयातही त्यांनी विरोध केला होता. विशेष म्हणजे, शिवसेना-भाजप सरकार पुन्हा स्थापन होण्यासाठी ते प्रयत्न करत होते. परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे मविआ सरकार स्थापन झाल्या पहिल्या दिवसापासूनच शिंदेंच्या मनात अस्वस्थता होती. सरकारमध्ये जाणं ठीक आहे, पण आपले विचार, तत्त्व, भूमिका एवढी पूर्णपणे बदलणं शिवसेनेतील एका गटाला पटत नव्हतं. उद्धव ठाकरेंना देखील ते वैतागले होते. ही आलेली संधी आम्ही सोडणार नव्हतोच, शिवाय जनादेशही आमच्या बाजूनेच होता. त्यामुळे आम्ही युती केली आणि सरकार स्थापन केलं, असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – HC on Jarange: जरांगेंना हायकोर्टाचा दणका! आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार?
हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारा
एकनाथ शिंदेंप्रमाणे उद्धव ठाकरेही तुमचे मित्र होते, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की उद्धव ठाकरेही माझे मित्र होते… यावर ‘मित्र होते की आहेत?’ असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, की ते आमचे मित्र आहेत का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. कारण मित्र तो असतो, जो एखादी गोष्ट जमत नाही, तर स्पष्ट सांगतो. त्यांनी फोन करून मनमोकळेपणाने बोलायला हवं होतं. पाच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. दिवसा रात्री आम्ही कधीही फोन करायचो, खूप वेळ बोलायचो, मी कधी त्यांचं बोलणं टाळलं नाही. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी फोन करत राहिलो, पण त्यांनी उत्तरच दिलं नाही. आम्हाला तुमच्यासोबत यायचं नाही, असं त्यांनी सांगायला हवं होतं. त्यामुळे ते आम्हाला मित्र मानतात का का, हा प्रश्न त्यांनाच विचारा. दरवाजा त्यांनी बंद केला, असं फडणवीस म्हणाले.
शिंदेंसोबत भावनिक युती, अजितदादांसोबत स्ट्रॅटेजिक
ज्यांच्यासोबत सुख दुःख वाटून घेतलं, २५ वर्ष भावासारखी वागणूक दिली, असे लोक पाठीत खंजीर खुपसतात, तुमच्या नेत्यांविषयी खोटं बोलतात, तेव्हा मन तुटतं, अशी खंत फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदेंशी आमची भावनिक युती आहे.
अजित पवारांसोबत युती ही धोरणात्मक असल्याचं मान्य करतो, पण कदाचित पाच वर्षांनी तीही भावनिक युती होऊ शकेल, असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – Gokhale Bridge : मुंबईकरांची गोखले पुलाची प्रतिक्षा संपेना; वाचा सविस्तर
महाराष्ट्रात अजूनही राजकीय संस्कृती
ठाकरेंशी बोलणं होतं का, या प्रश्नावर आमच्यात आता औपचारिक बोलणं होत नाही. आम्ही एकमेकांची विचारपूस करतो, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती तितकी टिकून आहे, असं ते म्हणाले. “वारं जोरदार वाहतंय, या वाऱ्याने बंद झालेला दरवाजा उघडेल का?” असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर “राजकीय मतभेद असते तर ठीक होतं, पण त्यांचे काही नेते आमचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. आता आम्ही मनाने दूर झालो आहोत. दिवसातून दहा वेळा मोदींना शिव्या दिल्या नाहीत तर त्यांना जेवण पचत नाही. एक जण तर त्यांनी शिव्या द्यायलाच ठेवलाय. सकाळी नऊ वाजता त्यांचा भोंगा सुरु होतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.