घरमुंबईईशान्य मुंबईत शांत शांत

ईशान्य मुंबईत शांत शांत

Subscribe

विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, मुलुंडमध्ये मतदानाचा टक्का घसरला

पूर्व उपनगरातील ईशान्य मुंबई मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारी घट झाल्याची दिसून आली. सकाळी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर मतदारसंघातील केंद्रावर तुरळक नागरिकांनी हजेरी लावली. तर दुपारी अनेक मतदार केंद्र ओस पडली होती. मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये नागरिकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीचा सण तोंडावर आल्याने मतदानाच्या सुट्टीचा सदुपयोग करत महिलांनी घरात फराळ बनवण्यास पसंती दिल्याचे तर काहींनी पावसाच्या भितीने मतदानाला जाण्याचे टाळले असले तरी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नव मतदारांचा उत्साह दिसून आला.

विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, मुलुंड, घाटकोपर या भागात सकाळी सात पूर्वी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरीमुळे नागरिकांनी सकाळी मतदान केंद्रावर जाण्याचे टाळले. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर या भागातील मतदान केंद्रावरील मतदान 11 टक्क्यांपर्यंतही पोहचले नव्हते. त्यानंतर मतदानाला थोडासा वेग आला असला तरी वाढलेले उन्ह आणि पावसाची शक्यता यामुळे नागरिकांनी पुन्हा मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर असलेली तुरळक गर्दीही दुपारच्या सत्रामध्ये गायब झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

अनेक केंद्रावर दुपारीच्या सत्रांवर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मतदान झाल्याचे चित्र होते. दिवाळी सण तोंडावर आल्याने अनेक महिलांनी घरी थांबवून दुपारी फराळ बनवण्याला पसंती दिल्याचे दिसून आले. ज्यामुळे मतदान केंद्रावर महिलांची संख्या फारच कमी होती. पावसापासून सुरक्षा, पोलिसांचा बंदोबस्त आणि मतदारांची बडदास्त निवडणूक विभागाकडून ठेवण्यात आली होती. मतदान यंत्र बंद पडण्याच्या तक्रारी या भागात दिसून आल्या नाहीत. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदानाला थोडा उशिर झाला असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये कमी झालेल्या मतदानाचा टक्का सायंकाळच्या सत्रामध्ये मात्र वाढलेला पाहायला मिळाला. सायंकाळी पाचपर्यंत मुलुंडमध्ये ३९.२२ टक्के, विक्रोळीत ४०.१० टक्के, भांडूप पश्चिम ५२.२२ टक्के, घाटकोपर पश्चिम ३९.७० टक्के, घाटकोपर पूर्व ३९.६७ टक्के, मानखुर्द ३३.३२ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे दुपारपर्यंत मतदार केंद्रावर नसलेली गर्दी सायकांळी दिसून आली. मतदान केंद्रांवर अपंगांसाठी लाकडी रॅम्प, ज्येष्ठ नागरिक-रुग्ण-अपंगांसाठी व्हीलचेअरची सोय, तसेच मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी रायडर्स सोय करण्यात आल्याने यावेळी तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मतदान करावयास मोठ्या संख्येने उतरले होते.

- Advertisement -

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -