घरमुंबईदेव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी

Subscribe

‘देव तारी त्याला कोण मारी’, या म्हणीप्रमाणे एक चमत्कार पूर्व उपनगरातील गोवंडीत गुरुवारी झाला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडूनदेखील एका दीड वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. विशेष म्हणजे एवढ्या उंचावरून पडून त्याला साधे खरचटलेदेखील नसल्याने गोवंडीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अथर्व बारकडे असे या दुर्घटनेत बचावलेल्या मुलाचे नाव आहे. व्यावसायिक अजित बारकडे हे एकत्र कुटुंबात गोवंडीतील जय गोपी कृष्णा हौसिंग सोसायटी या 12 मजली इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरील सी-४०१ मध्ये राहण्यास आहे. अथर्व हा अजित आणि मंगल बारकडे यांचा मुलगा असून लग्नाच्या 5 वर्षानंतर झालेले अथर्व हे एकुलते एक अपत्य आहे. गुरुवारी सकाळी घरातील सर्वजण कामावर जाण्याच्या गडबडीत असताना अथर्वच्या आजीने वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी खिडकी उघडली. कपडे काढून झाल्यानंतर त्या खिडकीचे दार बंद करण्यास ती विसरली. त्याच वेळी अथर्व हॉलमध्ये खेळत खेळत खिडकीजवळ गेला आणि तोल जाऊन खिडकीतून खाली पडला.सुदैवाने इमारतीच्या खालील अशोकाच्या झाडामुळे अथर्वला खरचटलेही नाही.

- Advertisement -

खिडकीजवळ असलेल्या अशोकाच्या झाडाची फांदी अथर्वच्या हाताला लागली आणि त्याने फांदी पकडली, परंतु फांदीवरून देखील त्याचा हात निसटून तो खाली पडला. अथर्व पडल्याचे लक्षात येताच घरातील सगळ्यांनी खाली धाव घेतली. त्यावेळी अथर्व उभा राहून रडत असल्याचे त्यांना दिसले. आई मंगलने त्याला कुशीत घेऊन नजीकच्या हॉस्पिटलात नेले. मात्र त्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नसल्यामुळे डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले.

अथर्व सुखरूप होता. मात्र घाबरल्यामुळे त्याला डॉक्टरांनी दाखल करून घेतले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -