घरमुंबईपहिले पाऊल उपक्रमाचा प्रारंभ; प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात - दीपक केसरकर

पहिले पाऊल उपक्रमाचा प्रारंभ; प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात – दीपक केसरकर

Subscribe

 

मुंबईः महाराष्ट्र राज्याला शिक्षणाची दीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रिबाई फुलेंसारखे आदर्श घरोघरी निर्माण करण्याचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्या संयुक्त वतीने आयोजित व ‘स्टार्स’ प्रकल्प अंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उद्घाटन मेळावा मंगळवारी पालिकेच्या वरळी सी फेस महानगरपालिका शाळेमध्ये पार पडला. यानिमित्ताने सदर उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते.

मंत्री केसरकर म्हणाले, मातृभाषेचा सतत अभिमान बाळगायला हवा. ज्या-ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या-त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे आपण आपली मातृभाषा म्हणजेच माय मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्त्राइल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. कारण त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.

- Advertisement -

भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या देशातील तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही तंत्रकुशल असायला हवी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्य शासन तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कोणकोणते उपक्रम राबवत आहे, याचीही त्यांनी माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना गणवेश, बूट-मोजे, वह्या-पुस्तके दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -