फेसबुक प्रियकराकडून ३५ लाखांची फसवणूक, लग्नाचे आमिषही दाखवले

तीन वर्षांपूर्वी तिची फेसबुकवरुन कमलेशशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने तिला त्याचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय असल्याचे सांगितले.

फेसबुकवर मैत्री करुन एका तरुणीची 35 लाख रुपयांची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला अहमदाबाद येथून कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. कमलेश हरिराम सुतार ऊर्फ तन्वीर असे या आरोपीचे नाव आहे.  त्याला बोरिवली कोर्टाने 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमलेश ऊर्फ तन्वीरवर पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. पिडीत तरुणी ही कांदिवली परिसरात राहत असून ती अविवाहीत आहे. तीन वर्षांपूर्वी तिची फेसबुकवरुन कमलेशशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने तिला त्याचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्याने लग्नासाठी प्रपोज केले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

काही महिन्यानंतर त्याने तिला त्याला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले असून तिने व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती केली होती. या विनंतीनंतर तिने त्याला 35 लाख रुपये दिले होते. तसेच गिफ्ट म्हणून महागडे घड्याळ आणि मोबाईलही दिला होता. पैसे मिळाल्यांनतर कमलेशमध्ये अचानक बदल झाला होता. तो लग्नासाठी तिला टाळू लागला. तिला न सांगता तो अहमदाबाद येथे पळून गेला होता. तिने फोन करु नये म्हणून त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. यावेळी तिने त्याची माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी तिला कमलेश हा विवाहीत असून त्याचे एका तरुणीसोबत गेल्या वर्षी लग्न झाल्याचे समजले. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे.

आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच तिने कांदिवली पोलिसात तक्रार केली होती. एपीआय सूर्यकांत पवार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता.  शोधमोहीम सुरु असताना कमलेश हा अहमदाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पथकाने त्याला तेथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. कमलेशने लग्न जुळविणार्‍या संकेतस्थळावर काही तरुणीची माहिती काढली होती. तो तिशी पार केलेल्या तरुणींची माहिती घेऊन त्यांच्याशी मैत्री करीत होता. विविध आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचा. पिडीत तरुणीकडून घेतलेल्या 35 लाख रुपयांतून त्याने पत्नीसाठी अहमदाबाद येथे एक ब्युटी पार्लर सुरु केला होता, अशी माहिती चौकशीत उघड झाली. या ब्युटीपार्लरच्या माहितीवरुन त्याला एपीआय सूर्यकांत पवार व त्यांच्या पथकाने अटक केली.