घरमुंबईअंध जन्मदात्याने केले चिमुकल्याचे अपहरण

अंध जन्मदात्याने केले चिमुकल्याचे अपहरण

Subscribe

अंध जन्मदात्यानेचे आपल्या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना अंधेरी येथे घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून सहा वर्षाच्या स्वत:च्या मुलाचे अपहरण करुन पळून गेलेल्या अंध पित्याला चार महिन्यांनी कुठलाही पुरावा नसताना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या एका विशेष पथकाने शिताफीने अटक केली आहे. हुसैन जुम्मन पठाण असे या आरोपी पित्याचे नाव असून त्याने त्याच्या मुलाला महालक्ष्मीच्या ‘महालक्ष्मी वास्तल्य फाऊंडेशन’ या अनाश्रमातात ठेवले होते. तेथून या मुलाचा ताबा घेऊन त्याला त्याच्या मावशीकडे सोपविण्यात आले आहे. मावशीकडे मुलाचा ताबा असल्यामुळे हुसैनने तिच्या तावडीतून मुलाचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले.

चार महिन्यानंतर अंध पित्याला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक

शबीना इब्राहिम शेख ही महिला मालाडच्या मालवणीतील गेट क्रमांक सातमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिची बहिण रशिदा हिचे २०१२ साली हुसैन पठाण याच्यासोबत लग्न झाले होते. हुसैन आणि रशिदा हे दोघेही अंध आहेत. लग्नानंतर त्यांना जिशान झाला होता. मात्र जिशानच्या जन्मानंतर रशिदाला काविळ झाली होती. त्यामुळे तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. रशिदाच्या मृत्यूनंतर जिशानचा ताबा मिळावा यासाठी फॅमिली कोर्टात शबाना आणि हुसैन यांच्यात वाद सुरु होता. दोन्हीकडची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने जिशानचा ताबा शबानाकडे सोपविला होता. हुसैन हा अंध असल्याने तो जिशानचा देखभाल करण्यासाठी असमर्थ होता. त्यामुळे त्याची मावशीच त्याचा चांगला सांभाळ करु शकते, असे मत नोंदवून कोर्टाने जिशानला शबानाकडे देत दर रविवारी हुसैनला जिशानला भेटण्याची परवानगी केली होती.

- Advertisement -

महालक्ष्मी वास्तल्य फाऊंडेशनमधून मुलाला घेतले ताब्यात

गेल्या एक वर्षांपासून शबाना ही जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकमध्ये सकाळी अकरा वाजता हुसैनला भेटून त्याला जिशान सोपवित होती. सायंकाळी पाच वाजता तो जिशान पुन्हा शबानाकडे सोपवून हुसैन निघून जात होता. १२ जानेवारीला शबाना ही जिशानला घेऊन जोगेश्वरी रेल्वे स्थानकात आली होती. त्याला हुसैनकडे सोपवून ती निघून गेली. सायंकाळी ती पुन्हा रेल्वे स्थानकात आली. मात्र हुसैन जिशानला घेऊन आला नाही. तिने या दोघांचा शोध घेतला. परंतु ते दोघेही कुठेच सापडले नाही. त्यामुळे तिने पुन्हा कोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने अंधेरी रेल्वे पोलिसांना हुसैनविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना हुसैन हा धारावी, माहीम आणि वांद्रे परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर एसीपी सुधीर जांमबडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या पथकातील राजेंद्र कुडवलकर, दळवी, कळसाईत व अन्य पथकाने त्याचा तिथे शोध सुरु केला होता. ही शोधमेाहीम सुरु असताना हुसैनला पोलिसांनी वांद्रे येथून शिताफीने अटक केली आहे. चौकशीत त्याने जिशानला महालक्ष्मी वास्तल्य फांऊडेशन या अनाथश्रमात ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तेथून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही माहिती नंतर शबानाला देण्यात आली होती. जिशानचा ताबा त्याच्या मावशीकडे सोपविण्यात आले आहे. अटकेनंतर हुसैनला बुधवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीत त्याने जिशानचा ताबा तिची मावशी शबानाकडे होता याचा राग होता. त्याला त्याचा ताबा हवा होता. मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे त्याला काहीच करता आले नाही, त्यामुळे त्याने त्याचे अपहरण करुन त्याला अनाथश्रमात ठेवले होते.

- Advertisement -

वाचा – अपहरण झालेल्या मुली सुखरुप; गिरगावमध्ये सापडल्या

वाचा – गोळीबार करून दोघा भावांचे अपहरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -