घरमुंबईमुंबईकरांच्या पायाखाली धोका, ५६ पूल कोसळण्याची भीती

मुंबईकरांच्या पायाखाली धोका, ५६ पूल कोसळण्याची भीती

Subscribe

मुंबईमध्ये आपण एल्फिन्स्टन, करीरोड, चर्नीरोड, दादर येथील टिळक पुलावरून जात असाल तर सावधान. आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईमध्ये ५६ पूल धोकादायक आहेत. यात ब्रिटिशकालीन पूलांचाही समावेश आहे.

मुंबईमध्ये आपण एल्फिन्स्टन, करीरोड, चर्नीरोड, दादर येथील टिळक पुलावरून जात असाल तर सावधान. आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईमध्ये ५६ पूल धोकादायक आहेत. यात ब्रिटिशकालीन पूलांचाही समावेश आहे. अंधेरी येथील गोखले पुलाला जोडलेल्या पादचारी मार्गिकेच्या दुर्घटनेनंतर मुंबईमधील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईमधील पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबईमधील २७४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी तीन सल्लागारांची नेमणूक करण्यात आली. गेल्या दोन वर्षात या सल्लागारांनी स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर केला नाही. पुलांची अवस्था दयनीय होत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पायाखालचे पूल कधी सरकतील हे सांगता येत नाही. अंधेरीतील दुर्घटनेनंतर पालिकेने आणि रेल्वेने जबाबदारी एकमेकांवर ढकलत विश्वामित्री पवित्रा घेतला होता.

एल्फिन्स्टन, करीरोड, चर्नीरोड, टिळक पुलावरून चालताना सावधान

पालिकेच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये ५६ पूल धोकादायक आहेत. मुंबईत एकूण २७४ पूल आहेत. त्यापैकी शहरात ७७, पश्चिम उपनगरात १३७ तर पूर्व उपनगरात ६० पूल आहेत. ब्रिटिशांनी आपल्या काळात मुंबईत ७७ पूल बांधले होते. त्यापैकी ३६ पूल रेल्वेवर तर ४१ पूल पादचारी आहेत. ब्रिटिशकालीन पूलांमध्ये एल्फिस्टन, करीरोड, चर्नीरोड स्टेशनवरील, दादर येथील टिळक व कर्नाक बंदर पुलांचा समावेश आहे. ब्रिटिशकालीन धोकादायक पूलांपैकी १४६ वर्ष जुन्या कर्नाक बंदर पुलाच्या बांधकामासाठी पालिकेने २ कोटी रुपये रेल्वेकडे जमा केले आहेत. तर असून १३५ वर्षे जुन्या हँगकॉक पुलाचे काम सुरु झाले आहे. लवकरच ९० वर्षे जुन्या दादर येथील टिळक पूलाचेही काम सुरु केले जाणार जाणार आहे.

- Advertisement -

मुंबईमधील २७४ पूलांचे ऑडिट सुरु असून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. हा अहवाल येत्या आठ ते दहा दिवसात सादर केल्यावर पुलांची नेमकी स्थिती समोर येईल. त्यानंतर त्यांची दुरुस्ती करावी किंवा नवा पूल बांधायचा याचा निर्णय घेण्यात येईल. रेल्वेवरील पूल धोकादायक असू शकतात. आयुक्तांच्या आदेशाने आता रेल्वे आणि पालिका पुलांची संयुक्तरित्या तपासणी करणार आहे.

– शितलाप्रसाद कोरी 
प्रमुख अभियंता, पूल विभाग, मुंबई महापालिका

- Advertisement -

रेल्वे हद्दीतील ४४५  पुलांचे आजपासून स्ट्रक्चरल ऑडिट

अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर पालिका आणि रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. शुक्रवारपासून
रेल्वे हद्दीतील सर्व ४४५  पुलांची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले जाणार आहे. गुरुवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत रेल्वे अधिकार्‍यांची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अंधेरी आणि विलेपार्ल्याला जोडणार्‍या गोखले पुलला जोडलेली पादचारी मार्गिका मंगळवारी अचानक कोसळली. यामध्ये पाचजण जखमी झाले. या घटनेनंतर पालिका-रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात सर्व पातऴीवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

स्ट्रक्चरल ऑडिट सहा जुलैपासून सुरु 

पुलाची जबाबदारी कुणाची यावरून वादही रंगला. यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पालिका- रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे. गुरुवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात पालिका – रेल्वे प्रशासन यांची विशेष बैठक झाली. आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या दरम्यान अधिक प्रभावी समन्वय साधण्याच्यादृष्टीने विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी, एफओबी, स्काय-वॉक इत्यादी प्रकारचे ४४५ पूल आहेत. या पूलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) सहा जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एकूण १२ चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या चमूंमध्ये भारतीय प्रोद्योगिकी संस्थान (आयआयटी, मुंबई) येथील तज्ज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्याही तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे.

दर महिन्यात घेतला जाणार आढावा

पुलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत, त्यांची संरचनात्मक तपासणी अगोदर करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळक पूल, एलफिन्स्टन पूल आदी तसेच महापालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्यामध्ये अधिक चांगला समन्वय नियमितपणे साधला जावा, या उद्देशाने आता यापुढे दर महिन्याला ठराविक दिवशी नियमितपणे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अभियंता व संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित राहतील आणि महापालिका व रेल्वेच्या यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याच्यादृष्टीने यथोचित कार्यवाही करतील.

तांत्रिक बिघाडामुळे मालगाडी थांबली

मुंबई / रोहा आणि अलिबागच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मालगाडी अडकली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मालगाडी रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे ट्रॅकवर मालगाडी उभी असल्यामुळे रोहा आणि अलिबागच्या ट्रॅकवर सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या दोन्ही फाटकांच्या बाजूला वाहनांची गर्दी झाली होती. मागून येणार्‍या रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या. तसेच रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -