घरमुंबईअखेर अग्निशमन दलाच्या त्या ३ जवानांना शहिदांचा दर्जा!

अखेर अग्निशमन दलाच्या त्या ३ जवानांना शहिदांचा दर्जा!

Subscribe

कल्याणमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या दोन आगीच्या घटनांमध्ये बचावकार्य करताना मृत्यू ओढवलेल्या ३ अग्नीशमन दलाच्या जवानांना शहीदांचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अग्निशमन दलाचे जवान हे अक्षरश: आगीशी खेळत असतात. वेळप्रसंगी आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करीत जीवाची बाजी देखील लावत असतात. अशीच जीवाची बाजी लावीत असताना वीरमरण आलेल्या केडीएमसीच्या अग्निशमन दलातील तीन जवानांना शहीदांचा दर्जा देण्यात आला आहे. प्रमोद वाघचौरे, अनंत शेलार आणि जगन आमले अशी तिघांची नावे आहेत. कल्याणमध्ये प्रथमच अग्नीशमन दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे या शहिदांच्या नातेवाईकांमध्ये न्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दुर्दैवी घटना…

१ नोव्हेंबर २०१८ रोजी कल्याण पश्चिमेतील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिराशेजारी असलेल्या रसायनमिश्रीत विहिरीत अग्निशमन दलाचे २ जवान पितापुत्रांसह गुदमरून मृत्यू पावले होते. त्यांना वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणारे अग्निशमन दलातील जवान प्रमोद वाघचौरे (वय ३५) आणि अनंत शेलार (वय ४५) या दोघांचाही मृत्यू झाला होता. मिथेन या विषारी वायूमुळेच या पाच जणांना जीव गमवावा लागला होता. तसेच कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा परिसरातील चायनीज सेंटरला लागलेली भीषण आग विझवत असतानाच अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे जवान जगन आमले यांना जीव गमवावा लागला होता. ही घटना महिन्याभराच्या अंतराने घडली होती. कल्याणमधील रोहिदास वाडयात प्रमोद वाघचौरे हे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. तर अनंत शेलार हे कोळीवाडा परिसरात राहत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. प्रमोद आणि अनंत हे दोघेही कुटुंबातले कर्ते पुरूष होते.

- Advertisement -

अखेर राज्य सरकारने दिली मंजुरी

कल्याणच्या दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलातील तीन जवानांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या तिघांनाही शहीदांचा दर्जा मिळावा यासाठी केडीएमसीच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी राज्य सरकारकडे पाठवला होता. अखेर राज्य शासनाने याला मंजुरी दिली आहे. कल्याणमध्ये प्रथमच अग्निशमन जवानांना शहीदांचा दर्जा मिळाला असल्यामुळे शहिदांना मिळणाऱ्या सवलती त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत. या जवानांच्या नातेवाईकांनी आयुक्त गोविंद बोडके यांचे आभार मानले आहेत.

काय आहे शहीद दर्जाच्या सवलती …

नक्षलवादविरोधात कारवाई करताना नक्षलवादी हल्ल्यात मृत वा जखमी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींच्या धर्तीवरच अग्नीशमन दलाच्या जवानांना सवलती आणि फायदे देण्यास महापालिकेच्या निधीतून मंजुरी दिली आहे.

  • एक हजार ते ६०० फुटांपर्यंत मोफत सदनिका
  • कायदेशीर वारसांना २५ लाख रुपये अनुदान
  • कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरी
  • दोन अपत्यांचं मोफत शिक्षण
  • मृत जवानांना सेवानिवृत्त होईपर्यंत वेतन, पदोन्नती सुरू राहणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -