घरताज्या घडामोडीलिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्यांची अग्निशमन दलाकडून सुटका

लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्यांची अग्निशमन दलाकडून सुटका

Subscribe

टिळक चौकात असणाऱ्या खेडा अव्हेन्यू नावाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ३ मुलं अडकली होती.

कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात तांत्रिक बिघाडामुळे तब्बल २ तास लिफ्टमध्ये अडकलेल्या ३  चिमुकल्यांची अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटांत सुटका केली आहे. टिळक चौकात असणाऱ्या खेडा अव्हेन्यू नावाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ३ मुलं अडकली होती. यामध्ये ४ वर्षांची मुलगी आणि ८ तसेच १२ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काहीही केल्या या लिफ्टचा दरवाजाच उघडत नव्हता. त्यामुळे सोसायटीने सुरुवातीला संबंधित लिफ्ट कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलवून प्रयत्न करून पाहीले. मात्र तांत्रिक बिघाड शोधण्याचे अनेक प्रयत्न करूनही या कर्मचाऱ्यांना काही केल्या हा दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर अखेर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला याठिकाणी बोलवण्यात आले.

महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी कोणताही वेळ न दवडता हायड्रॉलिक उपकरणाच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत लिफ्टचा दरवाजा उघडला आणि या तिन्ही मुलांची सुटका केली. ही मुलं सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर त्यांच्या पालकांनी आणि इतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडत अग्निशमन दलाचे आभार मानले. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे मुस्ताक मकानदार, विनायक लोखंडे, रमेश दिघे, निखिल ईसामे, मोनिश पाटील, पुष्पराज चंदनशिवे, प्रकाश शिंदे या जवानांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -