घरमुंबईभाजपपुढे शिवसेनेचे पुन्हा लोटांगण

भाजपपुढे शिवसेनेचे पुन्हा लोटांगण

Subscribe

निष्ठावान रहाटेंना बनवले बकरा ,फुटीर नार्वेकरांसाठी माघार

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने भाजपपुढे लाेंंटागण घातलेले आहे. ‘ए,बी व ई’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार रमाकांत रहाटे यांना अर्ज मागे घ्यायला लावत फुटीर भाजप नगरसेवक अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांचा विजय घडवून आणला. सुधार समिती आणि त्यानंतर स्थापत्य शहर समिती अध्यक्षपदाचा पत्ता कापल्यानंतर ‘ए,बी व ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन आयत्यावेळी त्यांना अर्ज मागे घ्यायला लावत पुन्हा एकदा निष्ठावान शिवसैनिकाला बकरा बनवण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेत निष्ठावानांपेक्षा दलबदलूंची चांदी होत असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘ए,बी व ई ’प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने रमाकांत रहाटे, भाजपच्यावतीने अ‍ॅड. मकरंद नार्वेकर आणि काँग्रेसच्यावतीने सोनम जामसुतकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे ३, भाजपचे ३ आणि काँग्रेसचे ४ तर सपाचे एक असे संख्याबळ आहे. मागील दोन वर्षे ही प्रभाग समिती भाजपच्या ताब्यात होती. भाजप पुरस्कृत अभासेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी सलग दोन वर्षे प्रभाग समिती अध्यक्षपद भूषवले होते. त्यामुळे यावर्षी हे पद नक्की कुणाच्या वाट्याला येईल, याबाबत निर्णय न झाल्याने शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले होते.मात्र, सोमवारी झालेल्या निवडणुकीत पिठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्ज मागे घेण्यासाठीचा वेळ जाहीर करताच शिवसेनेचे रहाटे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे नार्वेकर व काँग्रेसच्या जामसुतकर यांच्यात लढत झाली. यामध्ये नार्वेकर यांना ७ तर जामसूतकर यांना ४ मते मिळाली. त्यामुळे नार्वेकर यांना पिठासीन अधिकार्‍यांनी विजयी घोषित केले.

- Advertisement -

रमाकांत रहाटे हे मागील अनेक वर्षांपासून सुधार समिती सदस्य होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून अध्यक्ष म्हणून त्यांचीच चर्चा होती. परंतु यावेळी त्यांची सदस्यपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी स्थापत्य शहर समिती अध्यक्षपद दिले जाईल,असे बोलले जात होते. परंतु तेही आता मनसेतून शिवसेनेत आलेल्या प्रिती पाटणकर या नवख्या नगरसेविकेला देण्यात आले. त्यामुळेच त्यांना ए,बी व ई प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या अर्जावर खुद्द स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अनुमोदन दिले होते. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना माघार घ्यायला लावून पुन्हा एकदा रहाटेंचा गेम शिवसेनेने केला आहे. रहाटे हे कट्टर व निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. परंतु या निष्ठावान सैनिकासाठी मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून येत शिवसेनेला साथ दिलेल्या आणि त्यानंतर पदांचा लाभ घेत पक्षाला लाथ मारत भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या मकरंद नार्वेकर यांच्याशी सेंटींग करण्यात आली. पक्षाने त्यांना डावलल्याने शिवसेनेमध्येच तीव्र नाराजी पसरली आहे. शिवसेनेत निष्ठावंताना काहीच स्थान नसून दलबदलूंचा सन्मान केला जात असल्याने नक्की ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे का, असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -