घरमुंबईमहात्म्याचा विसर

महात्म्याचा विसर

Subscribe

छायाचित्र छापण्याचा  प्रस्ताव दोन वर्षे पडून 

सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी सरकारमान्य थोर व्यक्तींची छायाचित्रे लावणे बंधनकारक असते. छायाचित्र छापण्याची जबाबदारी असलेल्या राज्य सरकारच्या शासकीय मुद्रणालयाने महात्मा गांधींचे छायाचित्र छापण्यासंदर्भात 2016 मध्ये सामान्य प्रशासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे मुद्रणालयाकडे छायाचित्र उपलब्ध नाहीत. गांधीजींचे छायाचित्र खरेदी करण्यासाठी येणार्‍या व्यक्तींना हात हलवत माघारी जावे लागत आहे.
देशातील थोर व्यक्तींची सरकारची मान्यता असलेली छायाचित्रे छापण्याची जबाबदारी शासकीय मुद्रणालयाकडे आहे. परिणामी मुद्रणालयातूनच ही छायाचित्रे सरकारी कार्यालयांना दिली जातात. परंतु अनेक वर्षांपासून शासकीय मुद्रणालयाने महात्मा गांधींची छायाचित्रंच छापलेली नाहीत. थोर व्यक्तींची छायाचित्रे छापण्याची जबाबदारी शासकीय मुद्रणालयाची असली तरी त्यासाठी सरकारची परवानगी असणे गरजेचे असते.
गांधींसोबत अन्य थोर व्यक्तींच्या छायाचित्रांचा साठा संपल्याने 11 नोव्हेंबर 2016 मध्ये 34 थोर व्यक्तींची छायाचित्रे छापण्याचा प्रस्ताव शासकीय मुद्रणालयाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला होता. यामध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशी अनेक नावे आहेत
मात्र 34 थोर व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या महात्मा गांधींचे नाव वगळता अन्य सर्व थोर व्यक्तींची छायाचित्रे छापण्याची परवानगी सामान्य प्रशासनाने दिली आहे. गांधींचे छायाचित्र छापण्यास अद्याप सरकारकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे शासकीय मुद्रणालयाकडून गांधींचे छायाचित्रच छापण्यात आलेले नाही. छायाचित्र छापण्यासंदर्भातील प्रस्ताव 2016 मध्ये पाठवण्यात आला असला तरी यापूर्वी शासकीय मुद्रणालयातून मिळणारी छायाचित्रेही खासगी छपाई कंपनीकडून छापून घेतली आहेत. ती छायाचित्रेही संपल्याने व नवीन छायाचित्र छापण्यास परवानगी देण्याबाबत सरकारच्या उदासीनतेमुळे शासकीय मुद्रणालयाकडे गांधींचे छायाचित्रच उपलब्ध नाही.
  महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. शिक्षण विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांना गांधींची मूल्ये, तत्त्वांची माहिती व्हावी यासाठी वर्षभर कार्यक्रम आखले आहेत. त्याचप्रमाणे गांधी जयंतीच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘नई तालिम’ हा उपक्रमही राबवण्यात येत आहे. गांधींच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवून सरकार आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महात्मा गांधींचेे छायाचित्र छापण्यासंदर्भात सरकार मात्र उदासीन आहे. 150 व्या जयंतीनिमित्त शासकीय मुद्रणालयात गांधीजींचे छायाचित्र खरेदी करण्यासाठी जाणार्‍या व्यक्तींना हात हलवत माघारी यावे लागत आहे.
शासकीय मुद्रणालयाकडून 2016 मध्ये 34 थोर व्यक्तींची छायाचित्रे छापण्यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र गांधींचे छायाचित्र छापण्याला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने छायाचित्रे उपलब्ध नाहीत.
प्र.रा. धामणकर, सहाय्यक व्यवस्थापक (प्रकाशने), मुद्रण व लेखनसामुग्री.
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -