घरमुंबईफेसबुकवरील मैत्री पडली महागात

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

Subscribe

शिक्षिकेला साडेचार लाखांचा गंडा

माटुंग्यात राहणार्‍या एका शिक्षिकेला फेसबुकवर विदेशी नागरिकासोबत मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. मुंबईत भागीदारीत हॉटेल व्यवसाय खोलण्याच्या नावाखाली या विदेशी नागरिकाने शिक्षिकेला सुमारे ४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली. या प्रकरणी शिक्षिकेने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. माटुंगा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माटुंग्यातील भाऊ दाजी रोड परिसरात राहणारी ४० वर्षीय शिक्षिका ही घरातच खाजगी क्लासेस चालवते. २३ मार्च रोजी तिच्या फेसबुक खात्यावर मार्क गॅरी नावाच्या विदेशी तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट लिंकमध्ये मुंबईमध्ये हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी एका टिमची आवश्यकता मार्कने म्हटले होते. या उत्सुकतेपोटी शिक्षिकेने ही फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारली. काही वेळातच फेसबुक मॅसेंजवर तिला मॅसेज आला. तुम्ही हॉटेल व्यवसायासाठी इच्छुक आहात काय? त्यावर या शिक्षिकेने प्रश्न विचारत व्यवसायाबाबत अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. शिक्षिका आपल्या जाळ्यात अडकल्याचे सायबर ठगाने हेरले होते.

ठगांनी व्हॉटसअ‍ॅपवरुन चॅटींग करण्यासाठी तिला एक नंबर पाठविला. व्हॉटसअ‍ॅपवरुन व्हॉईस कॉलवर बोलणे सुरु झाले. मार्क गॅरी याने मुंबईत सुरु करणार्‍या हॉटेल व्यवसायात थेट भागीदारीच देण्याचे आमिष या शिक्षिकेला दाखविले.विदेशी व्यक्ती त्याच्या हॉटेल व्यवसायात आपल्याला भागीदार करीत असल्यामुळे ती आनंदित झाली होती. मी लवकरच दिल्ली विमानतळावर उतरून मुंबईकडे येणार असल्याचे मार्क गॅरी याने तिला मॅसेज करून कळवले. तिला विश्वास बसावा म्हणून त्याने विमान प्रवासाच्या तिकिटाचे आणि विमानात बसल्याचे छायाचित्र तिच्या व्हाट्सअपवर पाठवले. मार्क मुंबईत येणार या विचारात असतानाच दुसर्‍या दिवशी तिला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणारी एक महिला होती. दिल्ली विमानतळावरुन बोलत असल्याचे सांगून मार्कला एक मिलियन पाऊंड रोख रकमेसोबत पकडण्यात आल्याचे तिने सांगितले.

- Advertisement -

मार्कला पकडल्याचे ऐकून शिक्षिकेच्या पायाखालची जमीनच सरकली. रोख रक्कम जप्त करुन मार्कला दुसर्‍या दिवशी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे तिने शिक्षिकेला सांगितले. दरम्यान तिला मार्क गॅरीने कॉल करून विमानतळावरील अधिकारी अधिकारी प्रकरण मिटवण्यासाठी भारतीय चलनामध्ये ३५ हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने ही रक्कम मार्कने सांगितलेल्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केली.

एक मिलियन पाऊंड भारतीय चलनामध्ये बदलून घेण्यासाठी १लाख ८५ हजार रुपयांची गरज असल्याचे मार्कने तिला सांगितले. त्यानंतर तिने दुसरी रक्कम खात्यावर जमा केली, असे काहींना काही निमित्त सांगून मार्क नावाच्या कथित विदेशी नागरिकाने या शिक्षिकेकडून तब्बल ४ लाख ७० हजार रुपये उकळले, मात्र ही रक्कम व्याजासहित परत करतो असे सांगून बोगस करारपत्राचे फोटो काढून पाठवले. त्यांनतर शिक्षिकेने मार्क गॅरी याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल फोन बंद असल्याचे कळताच तिने त्याचा फेसबुक मसेंजर वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फेसबुक खाते देखील डिलीट केले असल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने माटुंगा पोलिसा ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -