घरताज्या घडामोडीआम्ही निर्लज्ज कुळातले नाही, दिलेली वचने पाळणारे - मुख्यमंत्री

आम्ही निर्लज्ज कुळातले नाही, दिलेली वचने पाळणारे – मुख्यमंत्री

Subscribe

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू होते. हल्ली मी तर या रस्त्यावरून येणच सोडून दिले होते. सुरू असलेले काम, चिखल आणि दुरावस्था बघितल्यानंतर इथून येणच नको असे वाटायचे. पण आज ब्रिज बघितल्यानंतर मला असे वाटते रोज या ब्रिजवरून यावे जावे इतका सुंदर हा ब्रिज केलेला आहे. महापालिकेने राज्याला अभिमान वाटेल असे हे काम महापालिकेने केले आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या लोकार्पणाच्या वेळी काढले. जवळपास ३ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आहे. मुंबईत उड्डाणपुलांचे महत्व वेगळ्या पद्धतीने सांगायला नको. उड्डाणपूलांमुळे आपण जवळ येतो. जे लोक सरकार म्हणून आपल्याला संधी देतात, त्या विश्वासाला खर करून दाखवणे ही आपली तितकीच जबाबदारी आहे. म्हणूनच जनता निवडून देत असते. आम्ही निर्लज्ज कुळातले नाही, आतापर्यंत जी वचने दिली ती पाळणारे आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्याचवेळी घाटकोपर मानखुर्द लिंकलगत राहणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचावण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते आज घाटकोपर-मानखुर्द फ्लायओव्हरचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुंबई आणि एमएमआर रीजनमधील ट्रॅफिक लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी हा पूल फार महत्त्वाचा आहे. PIC.TWITTER.COM/BANQX4ICTW

- Advertisement -

— AADITYA THACKERAY (@AUTHACKERAY) AUGUST 1, 2021

घाटकोपर मानखुर्द लिंकरोडवर राहणाऱ्या नागरिकांच्या वस्तीला गेल्या अनेक वर्षात बकालपण आलेले आहे. त्यांचाही राहणीमानाचा दर्जा उंचावणे म्हणूनच गरजेचे आहे. एसआरएच्या माध्यमातून या नागरिकांचेही राहणीमान उंचावण्यासाटी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून ही दिसणारी बकाल वस्ती येत्या काळात दिसणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी नवाब मलिक आणि राहुल शेवाळे यांनाही आवाहन करत या ठिकाणच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करा असे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी पुनर्वसनाच्या प्रकल्पातून नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करा. पण त्याचवेळी फ्लायओव्हरखाली पुन्हा एकदा तीच बकाल अवस्था निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्या असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. चांगल राहणीमान प्राप्त करून देताना या ब्रिजखाली नवीन वस्ती येऊ देऊ नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठीच पुर्नविकासाच्या माध्यमातून याठिकाणी बंदोबस्त करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणच्या विकासासाठी आखीव रेखीव काम करून ही वस्ती देखणी करण्यासाठीचे प्रयत्न करा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटाच्या काळात इतके महत्वाचे काम सुरू असतानाच घाटकोपर मानखुर्द लिंकरोडचे काम महापालिकेने पुर्ण केले याचा मुंबईकर म्हणून महापालिकेचा अभिमान आहे. कोरोनाच्या काळातही व्हायरसविरोधात लढा देताना पालिकेच्या टीमने मुंबई मॉडेल म्हणून आदर्श निर्माण केला. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच जनतेच सहकार्य असल्यानेच हे शक्य झाले. सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे असेही ते म्हणाले. मुंबईत विकासकामाची गती जोर धरलेला आहे. कोस्टल रोड वेगाने पुर्ण होत आहे. सरकार म्हणून महापालिकेला जे सांगाल ते दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले.

निमंत्रण नाही हा पालिका विरोधी पक्षनेत्यांचा अपमान – रविराजा

आज घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याबाबत आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण मला पालिकेतर्फे देण्यात आलेले नाही. सदर कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला याचा आम्हाला आदर आहे. महापालिकेच्या कार्यक्रमाचे नगरसेवक व गटनेते यांना निमंत्रण देणे अपेक्षित असताना मात्र मला निमंत्रणपत्रिका देण्यात आली नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान असून राज्य शासनाने कायद्याद्वारे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे . तरी मनपा प्रशासनाकडून हा अपमान सहन केला जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी सांगितले.

घाटकोपर उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्येः-

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा शीव (सायन) – पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे.

या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुज-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱया वाहनांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता.

त्यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने हा सुमारे ३ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.

सदर उड्डाणपूल हा शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा ३ मोठ्या नाल्यांवरुन जातो.

या पुलाची एकूण लांबी २.९९१ किलोमीटर तर रुंदी २४.२ मीटर इतकी आहे.

उत्तर वाहिनी ३ व दक्षिण वाहिनी ३ अशा एकूण ६ मार्गिका या पुलावर आहेत.

या उड्डाणपुलाचे बांधकाम खंडजोड (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व एकल स्तंभ पद्धतीने केलेले असल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका देखील वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

या पुलाच्या निर्मितीसाठी लागलेल्या साहित्याचा विचार करता एकूण १ लाख ०२ हजार २२५ घनमीटर काँक्रिट, १७ हजार १७५ मेट्रिक टन लोखंड (रेनफोर्समेंट स्टील), ४ हजार ४८६ मेट्रिक टन संरचनात्मक लोखंड (स्ट्रक्चरल स्टील), १ हजार मेट्रिक टन एच.टी. स्ट्रॅण्ड, ५८६ नग बेअरिंग्स आणि १० हजार ३६२ मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -