घरमुंबईगोपी टँक मंडईच्या नुतनीकरणाचा महापालिकेला विसर

गोपी टँक मंडईच्या नुतनीकरणाचा महापालिकेला विसर

Subscribe

मंडई ताब्यात घेवून दीड वर्षे उलटली तरी दुुरुस्ती कागदावरच

महापालिकेच्यावतीने पारंपारिक पध्दतीने नुतनीकरण करण्यात येणार्‍या मंडईपैकी एक असलेल्या माहिम येथील गोपी टँक मंडईच्या नुतनीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मंडईच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द करून महापालिकेच्यावतीने याचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेवून दीड वर्षे उलटत आले तरी गोपी टँक मंडईच्या नुतनीकरणाची कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरु केल्या नाहीत. त्यामुळे गोपी टँक मंडईतील गाळेधारकांची उपेक्षाच होत आहे.

मुंबईतील सी विभागातील मिर्जा गालिब मंडई,डी विभागातील लोकमान्य टिळक मंडई;जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई,गोपी टँक मंडई,क्रांतीसिंह नाना पाटील मंडई अशा पाच मंड्यांचे पारंपारिक पध्दतीने सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर केला. परंतु अजुनही ही घोषणा कागदावरच आहे.

- Advertisement -

माहिममधील सिटी लाईट सिनेमागृहासामोरील मुंबई महापालिकेच्या गोपी टँक मार्केटच्या पुनर्विकासाला सन २००९मध्ये मान्यता देण्यात आली होती. यामंडईतील परवानाधारक गाळेधारकांनी श्री साईनाथ सहकारी व्यापारी संकुल संस्था स्थापन करून ७० टक्के लोकांच्या संमतीने मेसर्स ओंकार रिअटल्स डेव्हलपर्स यांची विकासक आणि दाभोळकर ऍण्ड दाभोळकर यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली होती. यांना प्रथम २००९ मध्ये इरादा पत्र दिले होते, त्यानंतर ३६ महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा २०१३ मध्ये मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत फेब्रुवारी २०१६ मध्ये संपली. यासंदर्भात ऑक्टोबर २०१६ मध्ये विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

याबाबत सुनावणी घेऊन गोपी टँक मार्केटला देण्यात आलेले उद्देशपत्र रद्द करून या मार्केटचा पुनर्विकास तथा दुरुस्ती महापालिकेच्यामाध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार सुधार समितीने हा करार रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे ही मंडई महापालिकेच्या ताब्यात येवून दीड वर्षे उलटत आले तरी पारंपारिक पध्दतीने अद्यापही दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या नाहीत. आजही या मंडईमधील गाळेधारकांना तसेच मासे विक्रेत्या महिलांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. सात वर्षांपूर्वी ही मंडई चकाचक मंडई संकल्पनेखाली दुरुस्त करून प्रवेशद्वार बसवण्यात आले होते. परंतु त्यानंतर या मंडईची कोणत्याही प्रकारची डागडुजी केलेली नाही. त्यामुळे गाळेधारकांसह मासे विक्रेत्यांमध्येही तीव्र नाराजी पसरलेली आहे.

- Advertisement -

बाजार विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता मिर्झा गालिब मंडईचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे तर गोपी टँक मंडईच्या नुतनीकरणाची निविदा प्रक्रीया सुरु आहे. निविदा प्रक्रीया शेवटच्या टप्प्यात असून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त करून कामाला सुरुवात केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -