घरमुंबईये सुई लेंगे तो बच्चा पैदा नही होगा

ये सुई लेंगे तो बच्चा पैदा नही होगा

Subscribe

गोवर-रुबेला लसीकरण धोक्यात

गोवर आणि रुबेला रोगाच्या उच्चाटनासाठी राज्य शासनाने राज्यभरात लसीकरण मोहीम राबवली आहे. मात्र पालकांचे अज्ञान आणि शाळांच्या असहाकार्यामुळे ही लसीकरण मोहीम धोक्यात आली आहे. ही लस टोचल्यावर मुलींना भविष्यात मुले होत नाहीत, असे सांगत मुंबई शहरातील उर्दू शाळांमधील मुलींच्या पालकांनी लसीकरण मोहिमेवर अप्रत्यक्ष बहिष्कार घातला, तर शहरातील काही उच्चभ्रू शाळांमधील शिक्षकांनी यात न पडण्याचा निर्णय घेत ती जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. त्यामुळे गोवर, रुबेला या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

गोवर हा संक्रमक व घातक आजार असून त्यामुळे २०१६ मध्ये देशात ५० हजार मुलांचा मृत्यू झाला होता. तर रूबेला सौम्य संक्रमक आजार असला असून तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. गर्भवती स्त्रियांना हा आजार झाला तर अचानक गर्भपात अथवा बाळांना जन्मजात शारीरिक दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारत सरकारने गोवर आजाराचे निमूर्लन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईत महानगरपालिकांच्या आरोग्य केंद्रामार्फत ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळा-शाळांमध्ये जाऊन रुबेला, गोवरची लस देत आहेत. मात्र मुंबईतील उच्चभ्रू शाळांनी या लसीकरण मोहिमेवर अप्रत्यक्ष बहिष्कार घातला आहे. माहीम येथील बॉम्बे स्कॉटीश शाळेत लसीकरण मोहीम झालेली नाही. पालक, शिक्षक मिटिंगमध्ये पालकांनी संमती दिल्याशिवाय ही मोहीम राबवायची नाही, असे शाळेने ठरवले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका मॉली पॉल यांच्याशी संपर्क साधला असता मी फोनवर बोलणार नाही, आपण शाळेत येऊन भेटा, असे त्यांनी सांगते.

शहरातील इतर कॉन्वेन्ट शाळांनीही, विद्यार्थ्यांनी ही लस घ्यायची की नाही याची पूर्णत: जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. पालकांनी विनाशर्त संमती दिल्यास विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊ द्यायचे अशी भूमिका या शाळांनी घेतली आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक मिटिंगशिवाय लसीकरण होणार नाही, असे शाळांनी ठरवले आहे. मात्र याबाबत शाळा प्रशासन काहीही बोलायला तयार नाही.

- Advertisement -

मुंबईतील उच्चभ्रू इंग्रजी शाळांमध्ये ही परिस्थिती असताना शहरातील उर्दू शाळाही लसीकरण मोहिमेपासून वंचित राहिलेल्या आहेत. माहीमच्या अंजुमन इस्लाम जियाउद्दीन, प्राथमिक स्कूलमध्ये १०२५ मुली शिक्षण घेतात. मात्र त्यापैकी केवळ ७ मुलींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. वांद्रे येथील वांद्रे उर्दू माध्यम शाळेत लसीकरणाच्या दिवशी मुली शाळेत आल्याच नाहीत. बीपीई सोसायटी हायस्कूल, वांद्रे येथेही ही मोहीम राबवू दिली नाही. तशीच स्थिती मुंबईतील इतरही उर्दू शाळांची आहे. या शाळांमध्ये लसीकरणासाठी विद्यार्थ्यांचे पालकच तयार नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये अद्याप लसीकरण झालेले नाही.

खापर आमच्यावर
ही मोहीम यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाने कडक पाऊले उचलायला हवीत. आम्ही शाळाशाळांमध्ये जातो पण आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. उद्या ही मोहीम यशस्वी झाली नाही तर त्याचे खापर आमच्यावर फोडले जाणार आहे. आम्हाला कोणी सहकार्य करत नसेल तर आम्ही काय करणार, असे लसीकरण मोहीम राबवणार्‍या आरोग्य केंद्रातील एका महापालिका कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईत तीन दिवसांत १ लाख ६३ हजार मुलांना लसीकरण
भारतासह संपूर्ण राज्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण सुरू झालं आहे. महाराष्ट्रात जवळपास ४ कोटी मुलांचं लसीकरण करण्याचा मानस आहे. तर, मुंबईतील सव्वा कोटी लोकसंख्येपैकी जवळपास ३० लाख मुलांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून या तीन दिवसांत १ लाख ६३ हजार मुलांचं लसीकरण केलं गेल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. ज्याचं प्रमाण ७३.६ टक्के एवढे आहे.

२७ नोव्हेंबरपासून एमआर म्हणजेच गोवर-रुबेला लसीकरण मोहिम संपूर्ण भारतात राबवली जात आहे. त्यानुसार, मुंबईत ३ दिवसांमध्ये १ लाख ६३ हजार मुलांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरणानंतर काही मुलांना किरकोळ ताप आणि उलट्या येण्याच्या केसेस आढळल्या आहेत. पण, ही लस सुरक्षित आहे. एकदा वापरलेली लस पुन्हा कधीच वापरता येऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी अजिबात घाबरुन न जाता ही लस मुलांना द्यावी. “-डॉ. पद्मजा केसकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी, महापालिका

ये सुई देनेसे आगे
जाके लडकी बच्चा पैदा नही कर सकती, इसलिए हम अपने बच्ची को सुई देना नही चाहते। वैसे भी स्कूल के शिक्षकों का काम केवल पढाना है। वो इस झमेले में क्यूँ पडते है।
-फातिमा, एक पालक

किती जण या मोहिमेत सहभागी
१७५ आरोग्य केंद्रातील प्रत्येकी २० आरोग्य सेविका
आरोग्य केंद्रातील महापालिकेचे १० कर्मचारी
केईएम, सायन, भगवती अशा महापालिकेच्या मुंबईतील प्रत्येक हॉस्पिटलच्या पीएसएम डिपार्टमेंटचे प्रत्येकी २५ डॉक्टर

काय आहे गोवर?

गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवसानंतर दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बर्‍याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो.

काय आहे रुबेला?

रुबेला सौम्य संक्रमक आजार असून तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींनादेखील होतो. गर्भवती स्त्रियांना हा आजार झाला तर अचानक गर्भपात अथवा बाळांमध्ये जन्मजात शाररिक दोष निर्माण होऊ शकतो.

राज्य शासनामार्फत गोवर, रुबेला लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला विरोध करण्याबाबत काही तक्रारी आल्यास त्याची रितसर चौकशी केली जाईल.

-डॉ. दीपक सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -