कोरोनाचे संकट जाऊ दे… मुख्यमंत्र्यांचे सपत्नीक मुंबादेवी दर्शन

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळे गुरुवारी भाविकांसाठी खुली झाली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी नागरिकांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त आणि पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त, नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड आणि तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतुक केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माहिम दर्गात जाऊन दर्शन घेतले तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.