संदीप देशपांडे आणि संतोष धुरींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, 19 मे रोजी येणार निकाल

राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर पोलीसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खासगी गाडीत बसले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, ते गाडी न थांबवताच निघून गेले. यावेळी एक महिला पोलीस जखमी झाली. या प्रकरणी मनसे नेते संदपी देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई सत्र न्यायालय 19 मे रोजी निकाल देणार आहे.

सुनावणी वेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या तर्फे वकील सुजित जगताप यांनी युक्तिवाद केला. यावेळी स्थानिक पोलीस उपायुक्त प्रणय अशोक उपस्थित होते. संदीप देशपांडेच्या जामीन अर्जाला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आला. राज्य सरकारतर्फे जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात आले. जामीन दिल्यास पोलीस तपासावर परिणाम होऊ शकतो. गुन्हा दाखल करण्यात आलेले दोघेही राजकीय नेते आहेत, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला.

दरम्यान मनसेतर्फे वकील सयाजी नांगरे यांनी आम्हाला 149ची नोटीस दिली, त्याचा आम्ही सन्मान केला. जी घटना घडली ती दुदैवी आहे. आम्ही पोलीसांना धक्का दिलेला नाही. त्यामागे पळत आल्या आणि ड्रायव्हरने गाडी पुढे नेली त्यावेळी त्या पडल्या. पोलीस तक्रारीत कुठेच आम्ही धक्का दिल्यामुळे त्या पडल्या असा उल्लेख नाही, असा युक्तीवाद केला.

दरम्यान राज्य सरकारतर्फे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी संदी देशपांडे आणि इतर नेते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातून बाहेर पडले, तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांना बाजूला नेले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलून येतो, असे सांगितले. पण दोघे माध्यमांशी बोलन्याचा बनाव करत चालत्या गाडीत बसून पळून गेले. ते सुजान नागरीक आणि कायद्याचे नागरीक असते तर त्यांनी पोलिसांना सहकार्य केले असते, असा युक्तीवाद त्यांनी केला.