घरमुंबई६० कोटींची हायस्पिड लोकल ७ वर्षांपासून भंगारात

६० कोटींची हायस्पिड लोकल ७ वर्षांपासून भंगारात

Subscribe

मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा म्हणून पश्चिम रेल्वेने हायस्पिड रेक नावाची लोकल तब्बल ६० कोटी रुपये खर्चून तयार केली. पण ती परीक्षणात नापास झाल्याने मुंबईकरांच्या सेवेत काही दाखल झाली नाही. विरार कारशेडमध्ये पडून असलेल्या या लोकलचे पार्ट काढून आता दुसर्‍या गाडीला लावण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखवणार्‍या केंद्र सरकारने मुंबईकरांच्या ताटात काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही आपल्याला नाही. मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा म्हणून पश्चिम रेल्वेने हायस्पिड रेक नावाची लोकल तब्बल ६० कोटी रुपये खर्चून तयार केली. पण ती परीक्षणात नापास झाल्याने मुंबईकरांच्या सेवेत काही दाखल झाली नाही. विरार कारशेडमध्ये पडून असलेल्या या लोकलचे पार्ट काढून आता दुसर्‍या गाडीला लावण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पश्चिम रेल्वेकडून २०११ साली हायस्पिट रेक क्रमांक ११८१ ही गाडी खरेदी करण्यात आली. ही गाडी १४० ते १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या गाडीची दोन परीक्षणे पश्चिम रेल्वेने केली. मात्र या दोन्ही परीक्षणात ती गाडी नापास झाली. त्यामुळे गाडीत बदल करण्याचे ठरले. मग या गाडीचे पार्ट काढून ती सर्वसामान्य लोकलमध्ये रुपांतरीत करायचे ठरले. म्हणजे ही गाडी ८० किलोमीटर प्रति तास वेगाने धावले, अशी अपेक्षा होती. मात्र तीही फोल ठरली. विरार कारशेडमध्ये पडून असलेल्या या लोकलचे आता फॅन,लाईट असे पार्ट काढून सर्वसामान्य लोकलला लावण्यात येत आहेत. या लोकलची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यात करण्यात आली आहे.

ही गाडी मुंबईत आणल्यावर चेन्नई इंटिग्रल कोच कारखान्यातील इंजिनियरने या गाडीचे मुंबईत परीक्षण केले. त्यासाठी प्रवाशांच्या वजनाइतकी रेती आणि मातीच्या गोणी डब्यात भरण्यात आल्या. त्यानंतर ही गाडी धावली. पण अपेक्षित वेग गाडीला गाठता आला नाही. त्यामुळे ही लोकल नापास ठरली. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १०० लोकल ट्रेन आहेत. यामध्ये सिमेन्स कंपनीच्या १३, बम्बार्डियरच्या ७२ लोकल, दोन मेधा लोकल, ९ रेट्रोफिटेड तर ४ अलस्टॉम कंपनीच्या लोकल आहेत. १०० लोकलपैकी ८६ लोकल प्रत्यक्षात सेवेत असतात. तर अन्य लोकल या देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये जातात. ८६ लोकलच्या दररोज १,३६५ फेर्‍या होतात.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेच्या हायस्पिड रेक लोकलची दोन परीक्षणे झाली. पण त्यात ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे या हायस्पिड लोकलचे सामान्य लोकलमध्ये रूपांतर करण्यात येईल.
– संजय मिश्रा, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे.

मुंबईकरांसाठी हायस्पिड लोकल आणण्याचे स्वप्न रेल्वे प्रशासनानी पाहिले होते. मात्र ही लोकल परीक्षणात अपयशी ठरल्याने पश्चिम रेल्वेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाच पैसा जर सामान्य लोकलवर खर्च केला असता तर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. रेल्वेमंत्र्यांनी यावर योग्य निर्णय घेऊन ही हायस्पिड लोकल सामान्य लोकलमध्ये रूपांतरीत करून मुंबईच्या लोकल सेवेत दाखल करावी.

- Advertisement -

– समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ता.


नितीन बिनेकर । मुंबई

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -