घरताज्या घडामोडीहिंदमाता पुरमुक्त होणार! पर्जन्य जलवाहिन्या, नाले कामांवर ६० कोटींचा वाढीव खर्च

हिंदमाता पुरमुक्त होणार! पर्जन्य जलवाहिन्या, नाले कामांवर ६० कोटींचा वाढीव खर्च

Subscribe

लालबाग परिसरातील पर्जन्य जलवाहिनी कामांवर ३२.७२ कोटींचा वाढीव खर्च

मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादर, हिंदमाता परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून निर्माण होणाऱ्या पुरस्थितीपासून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी पालिकेने मायक्रोटनेलिंग पद्धतीने पर्जन्य जलवाहिन्या टाकणे व नाल्याच्या भिंतीची पुनर्बांधणी करणे इत्यादी ८३ कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. मात्र या कामांत काही बदल झाल्याने आता त्यापोटी पालिकेला अतिरिक्त ६० कोटींचा खर्च येणार आहे. मात्र ही वाढीव कामे सदर कंत्राटदाराला वेगळे नवीन टेंडर न काढता देण्यात आले आहे. यासंदर्भातील २ प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले असून या प्रस्तावांना पहारेकरी भाजप व विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत एका तासात ५० मिमी पेक्षाही जास्त मुसळधार पाऊस पडल्यास व समुद्राला त्याच वेळी भरती असल्यास हिंदमाता सारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. त्याचा स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. मुंबई महापालिकेने २६ जुलै २००५ च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ८ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील ६ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले असून अद्यापही माहुल व मोगरा पंपिंग स्टेशनची कामे प्रलंबित आहेत.

- Advertisement -

पालिकेने हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी साचून होणारी पूरस्थिती दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ब्रिटनिया पंपिंग स्टेशन उभारले मात्र तरीही हिंदमाता येथील पुरस्थित फार मोठा फरक पडलेला नाही. त्यामुळे आता हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचे भूमिगत टाक्या बांधून त्यात साठा करून त्याचा हळूहळू निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मायक्रोटनेलिंग पद्धतीने एफ/ दक्षिण भागातील डॉ. बी.ए.रोड मार्गावरील लालबाग पोलीस चौकीपासून ते श्रावण यशवंते चौकापर्यंत १८०० मिमी व्यासाच्या आकाराची अतिरिक्त पर्जन्यजलवाहिन्या टाकण्यात आली आहे. मुळात हे कंत्राटकाम १४.५०% जादा दराने मे.मिशिगन इंजिनियर्स या कंत्राटदाराला ३९.८३ कोटीत देण्यात आले. मात्र काही कारणास्तव कामातील बदल व वाढीव कामांमुळे खर्चात तब्बल ३२.७२ कोटी रुपयांची वाढ झाल्याने कंत्राटकामाची किंमत ३९.८३ कोटी रुपयांवरून थेट ७२.५६ कोटींवर गेले आहे.

तसेच, पालिकेच्या जी/ उत्तर भागातील दादर धारावी नाल्याच्या भिंतीच्या पुनर्बांधणीचे कामही पालिकेने मे.ए. पी.आय. सिव्हिलकॉन या कंत्राटदाराला १८ महिन्यांसाठी १९.८९% कमी दराने ४४.०४ कोटी रुपयांत दिले होते. मात्र काही वाढीव कामांमुळे मूळ कंत्राटकामाच्या किमतीत थेट २७.०७ कोटी रुपयांची वाढ होऊन कामाची किंमत थेट ७१.१२ कोटींवर गेली आहे. आतापर्यंत फक्त ३०% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७०% काम बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही कामांचा संबंध हिंदमाता परिसरातील पूरस्थितीशी निगडित असला तरी या दोन्ही कामांची एकूण मुळ कंत्राट किंमत ३९.८३ कोटी अधिक ४४.०४ कोटी अशी मिळून ८३.८८ कोटी रुपये होते. मात्र दोन्ही कामांत वाढीव कामे असल्याने कंत्राट किमतीतही तब्बल ५९.८० कोटींची वाढ होऊन कंत्राट किंमत थेट १४३ कोटी ६८ लाख रुपयांवर गेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अर्धांगवायूने पिडीत रुग्णांना तात्काळ आणि मोफत उपचार द्या; नगरसेवक सचिन पडवळांची आयुक्तांकडे मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -