घरमुंबईआता मुख्यमंत्र्यांचाही हितेंद्र ठाकूरांना फोन, ठाकूरांची भूमिका मात्र गुलदस्त्यातच

आता मुख्यमंत्र्यांचाही हितेंद्र ठाकूरांना फोन, ठाकूरांची भूमिका मात्र गुलदस्त्यातच

Subscribe

तीन आमदारांमुळे महत्व प्राप्त झालेल्या हितेंद्र ठाकूरांना फोन करून स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपर्क साधला आहे. अशी माहिती स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी गुरुवारी दिली. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांच्या जोगवा मागण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी विरारमध्ये येऊन बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याचा सिलसिला गेल्या सहा दिवसांपासून सुरु आहे. त्याचबरोबर विविध पक्षांचे वरिष्ठ नेते फोनवरून हितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधत आहेत.
हितेंद्र ठाकूरांचा महाविकास आघाडीला पाठिंबा असला तरी त्यांची शिवसेनेवर प्रचंड नाराजी आहे. ती नाराजी ठाकूरानी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने बोलून दाखवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठाकूरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

महाविकास आघाडीतील अनेकांनी प्रत्यक्ष विरारमध्ये येऊन ठाकूरांशी चर्चा केली. त्याआधी भाजपच्या अनेक नेत्यांनीही विरारमध्ये येऊन ठाकूरांशी बंद दाराआड चर्चा केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करून ठाकूरांशी संपर्क साधला होता.

- Advertisement -

दरम्यान, ठाकूरांची नाराजी दूर करण्यासाठी बुधवारी स्वतः शरद पवार यांनी ठाकूरांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोन करुन चर्चा केली. अशी माहित खुद्द ठाकूरांनी गुरुवारी दिली. आपण आपल्या तीन आमदारांसह मतदानासाठी जाणार आहोत, अशी माहिती देताना ठाकूरांना मते कुणाच्या पारड्यात टाकणार हे मात्र अद्याप उघड केलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानानंतरच ठाकूरांची भूमिका स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

एकनाथ शिंदे, रविंद्र फाटक मात्र अलिप्त –

- Advertisement -

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकड ठाण्यासह पालघर जिल्ह्याची जबाबदारी आहे. तसेच आमदार रविंद्र फाटक पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुखही आहेत. राज्यसभेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी हितेंद्र ठाकूरांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्क साधला असताना शिंदे आणि फाटक यांनी मात्र अलिप्त राहणेच पसंत केले आहे. सध्या ठाकूर आणि शिंदे यांच्यात फारसे जमत नाही. त्यांच्यातील दुरावा जगजाहिर आहे. दुसरीकडे, येत्या काही महिन्यात वसई विरार महापालिकेच्या निवडणुकाही आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फाटक यांनी ठाकूरांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे सांगितले जाते. महत्वाची बाब म्हणजे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे पालघऱचे खासदार राजेंद्र गावीत यांनीही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ठाकूरांची निर्णायक ठरणारी तीन मते मिळवण्यासाठी ठाकूरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -