घरमुंबईधोकादायक कोपर पूल बनला दुचाकींचे पार्किंग झोन

धोकादायक कोपर पूल बनला दुचाकींचे पार्किंग झोन

Subscribe

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र दोन महिने उलटूनही रेल्वे महापालिका प्रशासनाकडून अजूनही कामाला सुरूवात झालेली नाही. मात्र सध्या हा पूल पार्किंग झोन बनला आहे. दोन्ही बाजूने हा पूल बंद करण्यात आल्याने शेकडो दुचाकी पूलावर सर्रासपणे पार्क केल्या जात असल्याने नागरिकांना पुलावरून चालणेही कठीण होऊ बसले आहे. त्यामुळे कोपर पूल हा दुचाकींचा पार्किंग झोन बनला आहे.

१५ सप्टेंबरपासून पूल बंद

वाहतुकीच्या दृष्टीने कमकुवत झाल्याने कोपर ब्रीज २८ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र हा पूल बंद झाल्यास शहरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याने लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर पुलावरील अवजड वाहनांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र अखेर १५ सप्टेंबरपासून हा पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाहने ठाकुर्ली उड्डाणपूलावरून ये-जा करीत आहेत. पूल बंद केल्यानंतर एक महिना होऊनही पुलाच्या कामास सुरूवात झालेली नाही. पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरीगेटस आणि लोखंडी खांब लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुलावरील रहदारी बंद झाली आहे.

- Advertisement -

बेकायदेशीर पार्किंगवर नागरिकांची कारवाई करण्याची मागणी

आजूबाजूचे नागरिक विद्यार्थी पायी जाण्यासाठीच पुलाचा वापर करीत आहेत. मात्र सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो दुचाकी पार्किंग केलेल्या असतात. शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यापेक्षा बहुतांशी दुचाकी येथेच पार्क केलेल्या असतात. या अस्ताव्यस्त पार्किंगचा त्रास नागरिकांना आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. बेकायदेशीर केलेल्या पार्किंगमुळे पादचाऱ्यांना चालताही येत नाही. त्यामुळे पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच हा पूल बंद झाल्याने अनेक वाहन चालकांना ठाकुर्ली पूलावरून वळसा घालून जावे लागते. त्यामुळे याचाही त्रास होत आहे. पुलाच्या कामास लवकरात लवकर सुरूवात करावी, अशीही मागणी डोंबिवलीकर करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -