घरमुंबईठाण्यातील ८ हजार बेड्स नक्की कोठे? भाजपाच्या नगरसेवकाचा सवाल

ठाण्यातील ८ हजार बेड्स नक्की कोठे? भाजपाच्या नगरसेवकाचा सवाल

Subscribe

महापालिका प्रशासनाकडून केवळ आकड्यांची धूळफेक केली जात आहे का, अशी शंकाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तत्काळ बेड उपलब्ध होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. महापालिकेने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांतील बेडची संख्या केवळ १ हजार ८८ आहे. मात्र, आयुक्त विजय सिंघल यांनी फेसबूकवरील मुलाखतीत जाहीर केल्यानुसार ठाणे शहरातील ८ हजार बेड कोठे आहेत, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडून केवळ आकड्यांची धूळफेक केली जात आहे का, अशी शंकाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे शहरात सध्या `कोरोना’च्या रुग्णांना हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच तेथे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना दाखल केले जाते. तर बेडअभावी सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांवर घरातच उपचार सुरू असल्याचे समजते. ठाणे महापालिकेच्या वतीने www.covidbedthane.in ही वेबसाईट तयार करण्यात आली. या ठिकाणी उपलब्ध खाटांबाबत रुग्णांना थेट माहिती मिळते. मात्र, प्रत्यक्षात तेथे गेल्यानंतर महापालिकेच्या संमतीशिवाय दाखल केले जाणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यातून रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडत आहे. काही रुग्णालयांचे क्रमांकही टाकण्यात आलेले नाहीत, ही दुर्देवाची बाब आहे, असे पवार यांनी आयुक्त सिंघल यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या वेबसाईटवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २७०, कौशल्य हॉस्पीटलमध्ये ९१, वेदांत रुग्णालयात ११६, सफायर हॉस्पीटलमध्ये १३७, काळसेकर हॉस्पीटलमध्ये १४०, होरायझॉन प्राईममध्ये ५६, ठाणे हेल्थ केअरमध्ये ३९, टायटन हॉस्पीटलमध्ये ५१, मेट्रोपॉल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व वेदांतमध्ये प्रत्येकी ४७, लाईफ केअरमध्ये २४, सिद्धीविनायक मॅटर्निटी अॅण्ड जनरल हॉस्पीटलमध्ये ५० आणि पाणंदीकर हॉस्पीटलमध्ये २० जागांची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे शहरात केवळ १ हजार ८८ उपलब्ध असल्याचे दिसून येते. तर क्वारंटाईन केंद्र व हॉटेलांच्या माध्यमातून १ हजार ३६७ बेड उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने केवळ सुमारे अडीच हजार खाटा उपलब्ध आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात ३ हजार ६८२ रुग्ण आढळल्याचे नमूद केले आहे. त्यातील ४६ टक्के म्हणजे १ हजार ६७० रुग्ण घरी पाठविले असून, २ हजार १२ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. त्यामुळे तूर्त स्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रातील २ हजार १२ रुग्णांसाठी खाटांची आवश्यकता आहे. महापालिका क्षेत्रात ८ हजार खाटा उपलब्ध असल्याचे आयुक्तांनी म्हटले. परंतु, अजूनही रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तरी ८ हजार खाटा नक्की कुठे आहेत, याचा तपशील आयुक्त विजय सिंघल यांनी जाहीर करावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.


आता कोरोना पॉझिटिव्हवर घरीच होणार उपचार, ‘या’ असतील अटी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -