गोरेगावात रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून माजी नगरसेविकेने केला निषेध

गोरेगावात रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून माजी नगरसेविकेने केला निषेध. केली गणेशाचे आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी.

MUMBAI

 मुंबई – प्रभाग क्र. ५२ मधील दूधसागर रस्त्यावर पावसाळ्यात पडलेले खड्डे अद्यापही न बुजविल्याने माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी बुधवारी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह रस्त्यावर उतरून खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच, श्रीगणेशाचे आगमन होण्यापूर्वी पालिका प्रशासनाने मुंबईतील सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत,अशी मागणी माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी केली आहे.

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना मुंबईतील रस्त्यांवर आजही खड्डे दिसून येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईत खड्ड्यांची समस्या अद्यापही दूर झालेली नाही. दुसरीकडे पालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक आपल्या प्रभागात कामाला लागले आहेत. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या ही जनतेसाठी आणि माजी नगरसेवक यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

मुंबई महापालिका पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च करीत आहे. मात्र, नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर लगबगीने खड्डे बुजवले जातात. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी चांगले मटेरियल वापरले जात नाही. तसेच, खड्डे निकृष्ट पद्धतीने बुजवले जातात. त्यामुळे पावसाळ्यात ते बुजवलेले खड्डे पुन्हा उखडतात व खड्ड्यांची समस्या गंभीर होत जाते. याच खड्ड्यांमुळे रस्त्यांवर अपघात होऊन त्यामध्ये वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

गोरेगांव (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक ५२ मधील दूधसागर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी थातूरमातूर मलमपट्टी केल्यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.  नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी केली आहे.

सदर खड्डे समस्येबाबत पालिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी बुधवारी रस्त्यांवरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. या वेळी प्रिती सातम यांनी, १५ ऑगस्ट पर्यंत खड्डे कायमस्वरूपी भरले नाहीत तर १६ ऑगस्टपासून कोणत्याही क्षणी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.