घरमुंबईमहाराष्ट्रात शेकडो बंग, आमटे ‘निर्माण’ होतील

महाराष्ट्रात शेकडो बंग, आमटे ‘निर्माण’ होतील

Subscribe

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून डॉ.अभय व राणी बंग यांना डी.लिट

युवांमध्ये सामाजिक संवेदना आणि सामाजिक कार्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या सहकार्याने ‘निर्माण’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून भविष्यात महाराष्ट्रात शेकडो डॉ. अभय बंग, राणी बंग आणि प्रकाश आमटे, मंदा आमटे निर्माण होतील, असा विश्वास डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. ‘निर्माण’ उपक्रमातून महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचाचौथ्या विशेष पदवी प्रदान समारंभ मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाला. यावेळी डॉ. अभय बंग व राणी बंग यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रकुलपती गिरीष महाजन, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रकुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते. 13 वर्षांपूर्वी आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या सहकार्याने महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सामाजिक संवेदना व कार्याची प्रेरणा जागृत करणारा सामाजिक संस्कार देण्याचा ‘निर्माण’ हा उपक्रम आम्ही सुरू केला.

- Advertisement -

त्यामध्ये आजवर शेकडो डॉक्टरांनी काम केले आहे. सामाजिक संस्कार घेतलेले हे डॉक्टर आज छत्तीसगड, ओरिसा, गुजरात येथील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. ‘निर्माण’ उपक्रमातून एक अभय, राणी बंग आणि प्रकाश व मंदा आमटे नाही तर शेकडो बंग व आमटे तयार होतील. जे महाराष्ट्रातल्या आदिवासी, ग्रामीण, शहरी झोपडपट्यामध्ये अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची मुक्तता करण्यासाठी तयार होतील, अशी मला आशा आहे नव्हे माझे ते स्वप्नच असल्याचे डॉ. अभय बंग यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मोठ्या प्रमाणात ज्ञान व कौशल्य देते. परंतु हे ज्ञान व कौशल्य कशासाठी, कोठे, कसे वापरायचे हा जीवनाचा उद्देश शिकवत नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा कसा, कोठे, कशासाठी वापर करायचा हा ब्रह्मप्रश्न तरुण डॉक्टरांसमोर असल्याचे सांगत बंग यांनी स्वत:च्या अनुभवातून त्यावरील उत्तरही यावेळी दिले. गीता ही क्लासरुममध्ये नव्हे तर कुरुक्षेत्रात शिकता येते. कुरुक्षेत्रात शिकवलेली गीता अमर झाली. त्याप्रमाणे मलाही सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण गडचिरोलीमध्ये 33 वर्षे काम करताना मिळाले. त्यामुळे माझे खरे शिक्षण सेवाग्राम व गडचिरोलीत जीवनाच्या विद्यापीठात झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. जीवनाच्या विद्यापीठात मला मिळालेल्या शिक्षणावर आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अधिकृत मोहर उमटवण्यात आली आहे. विद्यापीठाने आम्हा दोघांना डी.लिट देऊन डॉक्टरचे डॉक्टरेट केल्याचे सांगत त्यांनी विद्यापीठाचा आभार मानले.

- Advertisement -

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, कुपोषणमुक्ती, दारुबंदी, तंबाखूमुक्ती आदी विविध क्षेत्रात बंग दाम्पत्याने केलेल कार्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. शासनालाही त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहीले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आज डि. लिट पदवीने त्यांचा सन्मान केल्याने या पदवीचाही सन्मान झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सुलभीकरण गरजेचे – राज्यपाल
आपले हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी चीन, रशिया, युक्रेनमध्ये जातात. आपल्या विद्यापीठांपेक्षा तेथील वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे अधिक सोपे आहे. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाही कशी सुलभरित्या होईल याबाबत विचार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यात गरीब आणि आदिवासी बांधवांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे आणि त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी बंग दाम्पत्याने केलेले कार्य फार मोठे आहे. वैद्यकीय पेशा स्वीकारताना घेतलेल्या शपथेचे तंतोतंत पालन करुन त्यांनी मानवतेसाठी काम केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

मानसिकता बदलाचे काम केले – मुख्यमंत्री
डॉ. बंग दाम्पत्याने आपल्या उपक्रमातून लोकांमधील समज – गैरसमज दूर करुन मानसिकता बदलाचे काम केले. मागील दोन वर्षांपासून त्यांनी तंबाखूमुक्त जिल्ह्याचा उपक्रम अनोख्या पद्धतीने राबवला. बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, आदिवासींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे यासाठी बंग दाम्पत्याने केलेले कार्य मोठे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -