IRCTC ची दिशा देणार रेल्वे प्रवाशांना रिफंडची माहिती

आयआरसीटीसीने आस्क दिशा नावाची नवीन सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना आपल्या तिकिटांचा रिफंड केव्हा मिळणार यांची माहिती मिळणार आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे देशातील सर्व प्रवासी रेल्वेच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना तिकिटांचे रिफंड रेल्वेकडून देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवाशांना रिफंड मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांकडून वारंवार रिफंड केव्हा मिळणार अशी विचारणा होत होती. याला लक्षात घेता आयआरसीटीसीने आस्क दिशा नावाची नवीन सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना आपल्या तिकिटांचा रिफंड केव्हा मिळणार यांची माहिती मिळणार आहे.

आस्क दिशाची सुविधा

कोरोनामुळे देशातील रेल्वेच्या सर्व प्रवासी वाहतूक २२ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे रिफंड प्रवाशांना देण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी  रेल्वेकडून देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत, तर हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावरून  ऑनलाईन तिकीट काढलेल्या प्रवाशांना थेट त्यांच्या खात्यात रिफंड जमा करण्यात येत आहे. मात्र, प्रवाशांना आपल्या तिकिटांचा रिफंड नेमका कधी मिळणार यासंबंधीसुद्धा प्रवाशांच्या अनेक तक्रारी आयआरसीटीसीला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना आपल्या तिकिटांचा रिफंड कधी मिळणार याची माहिती सहज मिळावी याकरिता आयआरसीटीसीने आर्टिफिशियल इंटेलिजेंटवर आधारित आस्क दिशा चॅटबोट सुविधा दिली आहे.

२०१८ पासून सुविधा

आयआरसीटीसीने आस्क दिशा चॅटबोट सुविधा २०१८ पासून प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीने वारंवार या चॅटबोटमध्ये सुधारणा केल्या आहेत. आस्क दिशा चॅटबोट एक विशेष संगणकीय प्रोग्राम आहे. आस्क दिशा तिकीट रद्द, रिफंड स्टेटस, ट्रेनची स्थिती, वेळापत्रक, पीएनआर क्रमांक, रिटायरिंग रूमबाबत माहिती देते.

दोन भाषेत मिळणार सुविधा

आस्क दिशा चॅटबोट सुविधा ही दोन भाषेत आहे. हिंदी आणि इंग्रजी त्यामुळे ग्राहक आणि चॅटबोट दरम्यान होणारा संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होत आहे. तसेच आयआरसीटीसीने प्रवाशांच्या सुविधेसाठी वारंवार या चॅटबोट सुधारणा करण्यात येत आहे. आता फक्त दोन भाषेत ही सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी भाषेतसुद्धा ही सुविधा उपल्बध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.