घरताज्या घडामोडीधनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने का दिला दिलासा, जयंत पाटलांनी दिलं कारण!

धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने का दिला दिलासा, जयंत पाटलांनी दिलं कारण!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडच्या परळीतील आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस तपास होईपर्यंत तूर्तास मुंडेंचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘पोलीस तपासात मुंडे चुकीचे आढळले, तर त्यावर पक्ष निर्णय घेईलच. पण त्याआधीच निष्कर्ष काढून त्याची नाहक बदनामी होत असेल, तर ते थांबायला हवं’, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

गुरुवारी मध्यरात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा तूर्तास घेण्याची आवश्यकता नाही असे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे मुंडेंना दिलासा मिळाला असला, तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून टीका करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मुंडेंवर राष्ट्रवादी काँग्रेसने लगेच कारवाई का केली नाही? याविषयी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले जयंत पाटील?

याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात इतर दोघांनी देखील आरोप केले आहेत. तिला ब्लॅकमेल करण्याची सवय असल्याचं त्यातून दिसतंय. भाजपच्या एका माजी आमदाराने देखील तसंच सांगितलं आहे. त्यामुळे या सगळ्याची योग्य तपासणी होणं गरजेचं आहे. राजकीय कार्यकर्ता घडण्यात अनेक वर्ष लागतात. कुणीतरी उठून काहीतरी आरोप करायचे आणि ते गृहीत धरून त्याचं राजकीय जीवन संपवायचं हे चुकीचं आहे. झालेल्या आरोपांची स्पष्ट आणि सखोल चौकशी व्हावी. हे का घडलं, याचाही खुलासा व्हावा. मुंडेंच्या मोबाईल फोनवर महिलेने दिलेल्या धमक्या आणि इतर गोष्टींचा तपास व्हायला हवा. गेल्या काही वर्षांत धनंजय मुंडे कोणत्या त्रासात होते आणि त्यांचा छळ कसा झाला, याचीही माहिती पोलिसांनी घ्यावी’, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, ‘मुंडे चूक असतील, तर त्याबाबतही आमची तक्रार नाही. पण महिलाच अशा गोष्टी जाणीवपूर्वक करत असेल, तर त्याचीही चौकशी व्हायला हवी. सगळ्यांनी आत्ताच निष्कर्षावर येण्याची आवश्यकता नाही. मुंडेंनी स्वत: १२ नोव्हेंबरला पोलीस तक्रार केली आहे. त्यासोबतच उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली आहे. वेगळ्या मार्गाने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला का? याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. पोलिसांच्या तपासाअंती जो निष्कर्ष निघेल, त्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल’, असं देखील पाटील म्हणाले.

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांवर साधला निशाणा!

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘भाजपचे चंद्रकांत पाटलांसारखे नेते आमच्या नेत्याला टार्गेट करून त्याच्यावर खोटे आरोप करत असतील, तर त्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी. विरोधी पक्षाच्या टीकेला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्नही करत नाही. लवकरात लवकर याचा खुलासा करण्यात यावा. एखाद्याची नाहक बदनामी होत असेल, तर हे टाळायला हवं’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -