घरमुंबईकेडीएमसी प्रशासनाविरोधात रहिवाशांचे मुंडण आंदोलन

केडीएमसी प्रशासनाविरोधात रहिवाशांचे मुंडण आंदोलन

Subscribe

कल्याण पूर्वेतील मातृछाया कॉलनीसाठीच्या पोहोच मार्गाचे अर्धवट केलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून रहिवाशी ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले आहेत. मात्र पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि रहिवाशांनी उपोषणाच्या ठिकाणी आज (मंगळवार) महापालिका प्रशासनाचे श्राद्ध घालीत मुंडण आंदोलन केले. बुधवारपासून (उद्या) आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कडाक्याच्या उन्हात सुरु असलेल्या या उपोषणाकडे लक्ष देण्यास निगरगट्ट महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याने आज सकाळी उपोषणस्थळी महापालिकेचे श्राद्ध घालीत गौतम कांबळे, मुकुंद कांबळे, अजित कर्पे, गणेश खाकम या उपोषणकर्त्यांनी मुंडण करून घेत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सायंकाळी प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी आज उपोषण मागे घेण्याबाबत पत्र देण्याचा प्रयत्न केला, मात्र उपोषणकर्त्यांनी पत्र स्वीकारण्यास नकार दिला. उपोषणकर्त्यांनी बुधवारपासून आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले. या प्रकरणामुळे आंदोलनाला अधिकच धार येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जगन्नाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट दिली व पोहोच मार्ग होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसेवक निलेश शिंदे, प्रशांत काळे, बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश पंडागळे यांच्यासह अनेक मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देत आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी महापालिका प्रशासन निगरगट्ट असल्याचा आरोप करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

काय आहे प्रकरण

काटेमानिवली भागातील मातृछाया कॉलनीच्या आजूबाजूला वस्ती वाढल्याने या कॉलनीतील रहिवाशांचा मुख्य रस्त्यावर येण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद झाल्याने गटार बंद करून त्यावरून पोहोच मार्ग बांधून देण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने गटारावर रस्ता बांधून पोहोच मार्ग बनविण्याचे सुरु केलेले काम दुसऱ्याच दिवशी थांबविले. सदरचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याला महापालिका प्रशासन दाद लागून देत नसल्याने येथील रहिवाशांनी आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने पुना लिंक रस्त्यावरील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर गेल्या मंगळवारपासून पूर्णवेळ साखळी उपोषण सुरू आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -