घरमुंबईकेईएममध्ये मिळणार बलात्कार पीडितांना मदत

केईएममध्ये मिळणार बलात्कार पीडितांना मदत

Subscribe

वन-स्टॉप क्रायसिस सेंटर सुरू करणार

बलात्कार,लैंगिक शोषण आणि अ‍ॅसिड हल्ल्यांच्या पिडीतांसाठी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात वन-स्टॉप क्रायसिस सेंटर (One-stop crisis centres) सुरू केले जाणार आहे. पहिल्यांदाच पालिकेच्या रुग्णालयात हे सेंटर सुरु केले जाणार आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या मते या केंद्रातून तणावग्रस्त पीडित व्यक्तींना वैद्यकीय तपासणी, रुग्णालयात औषधोपचार आणि सल्लामसलत यासाठी मदत होणार आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक किंवा बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडल्यानंतर त्यांच्या काही तपासण्या करण्यासाठी, समुपदेशन करण्यासाठी रुग्णालयात आणले जाते. त्यासाठी त्यांना मातृत्व, मनोचिकित्सा, फॉरेंसिक इत्यादी विभागांकडे जावे लागते. ही एक मानसिक ताण देणारी स्थिती असल्यामुळे त्यांना बर्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व विभाग आणून पिडीताचे समुपदेशन करणे, त्यांना मानसिक आधार देणे शक्य होणार आहे. त्यातून पोलिसांनाही संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट पटकन तयार करणे शक्य होईल.

- Advertisement -

रुग्णालयातील आपत्कालीन विभागातच हे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालयात पीडित रुग्ण दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयाकडून त्याचा आरोग्य अहवाल तयार केला जाणार आहे.

केईएम रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘‘दरवर्षी २०० अत्याचार पीडित महिला केईएममध्ये उपचारांसाठी येतात. २०१२ पासून रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात या पीडितांवर वैद्यकीय उपचार होतात. पण, या विभागात मानसोपचार तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांना बोलावून उपचार दिले जातात. त्यामुळे बराच वेळ लागतो. शिवाय, बलात्कार पीडितांना वारंवार प्रश्न विचारल्याने त्या मानसिकरीत्या खचून जातात. म्हणून रुग्णालयात ‘One-stop crisis centres’ सुरू केले जाणार आहे. या केंद्रात स्त्रीरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ एकाच ठिकाणी एकाचवेळी उपलब्ध असणार आहेत.

- Advertisement -

दोन टप्प्यात सुरू करणार सेंटर

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, या पीडितांसाठी सुरू होणार्‍या वन-स्टॉप क्रायसिस सेंटरविषयी येत्या बुधवारी बैठक होणार आहे. हे सेंटर दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र पूर्णपणे तयार केले जाईल. जिथे त्या पीडितांसाठी एक रुम असेल. ज्यात याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध असेल. तर पुढील तपासणी आणि त्यासंबंधित सर्व उपचारही इथेच दिले जातील. एका महिन्याच्या आत केईएममध्ये पहिल्या टप्पा सुरू होईल. तर, दुसर्‍या टप्प्यात अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाणार आहे. ज्यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या टप्प्यात त्या पीडितेला कायद्याबाबतची काही मदत हवी असल्यास ती देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. केईएम व्यतिरिक्त हे सेंटर इतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही सुरू करण्याचा विचार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -