घरCORONA UPDATEआम्ही चाललो आमच्या गावा....!

आम्ही चाललो आमच्या गावा….!

Subscribe

‘मुंबई कधीही कोणाला उपाशी ठेवत नाही’, ही ख्याती कोरोनाने अवघ्या दीड महिन्यात बदलली आहे. रोजगार नाही, कामधंदा नाही यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांनी आता मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून गावी जाण्याची परवानगी मिळत नसल्याने आणि खिशामध्ये तिकिटाचे पैसे नसल्याने कुटुंबकबिला घेऊन हे मजूर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक येथील आपल्या गावी पायीच निघाले आहेत. मात्र त्यांना मुंबईची सीमा असलेल्या दहिसर, मुलुंड, वाशी आणि ऐरोली येथे पोलिसांकडून अडवून माघारी पाठवण्यात येत आहे. परंतु ‘हमें गांव जाना है, बम्बई में और कितने दिन भूखे रहेंगे.. ‘ असे सांगत काही झाले तरी गावी जाणार असा ठाम निर्धार ते बोलून दाखवत आहेत.

देशाच्या कानकोपऱ्यातून अनेकजण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज मुंबईत येत असतात. या प्रत्येकाला मुंबईमध्ये दोन वेळचे जेवणही मिळते. दिवसभर अंगमेहनत करायची आणि रात्री पदपथांवर पथारी टाकून तेथेच आपले बस्तान मांडत अनेक मजूर वर्षनुवर्षे जगात आले आहेत. पण दीड महिन्यापूर्वी राज्यामध्ये पसरलेल्या कोरोनामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईतील या बेघर मजुरांसाठी शेल्टर होम उभारत त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याची व्यवस्था केली. परंतु तेथील व्यवस्था फार चांगली नसल्याने मजूर तेथे राहण्यास तयार नव्हते. मुंबईतील कामाठीपुरा, शिवडी, भायखळा, रे रोड, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, विद्याविहार, सायन, धारावी, माहीम, अंधेरी, साकीनाका, घाटकोपर, बोरिवली आणि जोगेश्वरी या भागात मोठ्या प्रमाणात मजूर राहत आहेत. लॉकडाऊनमुळे मुंबईतील छोटे मोठे अनेक व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहेत. मोलमजूरीची सर्व कामे बंद आहेत. रोज कमवायचे आणि खायचे. त्यामुळे पैशांअभावी त्यांच्यासमोर दोन वेळेच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

मुंबईतील लॉकडाऊन लवकर संपण्याची आशा धूसर झाल्याने आणि त्यानंतरही रोजगार मिळण्याची कमी असल्याने या मजुरांनी आता आपल्या घरी जाण्याचा मार्ग धरला आहे. खिशात पैसे नसल्याने आणि सरकार गावी जाण्याची व्यवस्था करत नसल्याने या मजुरांनी आता आपले सामान डोक्यावर घेऊनच पायी गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून मुंबईच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात मजुरांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येत असले तरीही ते गावी जाणारच या निर्णयावर ठाम आहेत. महामार्गावर पोलीस असल्याने हे मजूर शहरातील अन्य मार्गांचा वापर करत मुंबईतून ठाणे, नवी मुंबई, वसई- विरार या शहरांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे या मजुरांना रोखणे हे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मुंबईतील अनेक रिक्षाचालकांनी आपले सामान रिक्षामध्ये भरून गावाचा मार्ग धरला आहे. जवळपास १०० पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी नाशिकपर्यंतचे अंतर कापले असून तसेच मजल दरमजल करत त्यांनी आपले गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. गावी जाता यावे यासाठी अनेकांनी दोन दिवसांपासून मेडिकल प्रमाणपत्रासाठी मुंबईतील हॉस्पिटल, पोलीस स्टेशनबाहेरही रांगा लावल्या आहेत.

बम्बई मे इतने दिन हमे कुछ सामाजिक संस्थाओने खाना दिया, लेकिन अब आज क्या कितने दिन ऐसेही जियेंगे… गांव में कुछ भी काम करेंगे फिर बाद का बाद में देखेंगे… असे सांगत रामप्रसाद शर्मा याने काहीही झाले तरी गावाला जाणारच असे ठामपाने सांगितले. वाशीहुन कर्नाटकला जाण्यासाठी बस तयार आहे असे आमच्या एका नातेवाईकाने सांगितल्याने आम्ही वाशी मार्केटला जाण्यासाठी निघालो आहोत, पण पोलीस जाऊच देत नाहीत. त्यामुळे आम्ही इस्टर्न एक्सप्रेसवर अडकून पडलो आहोत. आम्ही बोरीवलीहून चालत आल्याचे एका मजुराने सांगितले. आम्ही बांधकाम मजूर आहेत. लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने घरमालकाने सांगितलं गावी जा. काम नाही तर इथे थांबून काय करणार? मुलाबायको सोबत गावी चाललो असल्याचे शंकरने सांगितले.

- Advertisement -

सांताक्रूझ येथून सकाळी ५ वाजता निघालो आहोत. मुलगी भिवंडीला राहते. जावायाने जौंधपूरला जाण्यासाठी गाडी केली आहे. पण भिवंडीला जाणे शक्य नसल्याने सकाळी पाच वाजता बायको आणि मुलाला घेऊन चालत निघालो आहे. पाय चालून चालून थकलेत. पोलिस मागे पिटाळतायत. ‘एक कदम भी पिछे नही हटेंगे’ दोन महिन्यापासून काम नाही. घरातलं सगळं संपलंय. म्हणून गावी जायचंय, अशी भावना रोशन कुमारने व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -