घरमुंबईवाहक-चालक अभावी एसटीच्या मुंबई विभागला लागणार टाळे ?

वाहक-चालक अभावी एसटीच्या मुंबई विभागला लागणार टाळे ?

Subscribe

 कर्मचार्‍यांच्या बदल्या एसटीला पडल्या महागात ,सुट्टीच्या हंगामात एसटीचे करोडो रुपयांचे होणार नुकसान

एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या तुघलकी कारभाराचा फटका आता एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाला बसला आहे. एसटी महामंडळाने एसटीच्या वाहक-चालकांची, त्यांच्या इच्छित स्थळी बदली केल्यामुळे एसटीच्या मुंबई विभागात वाहक-चालक कमी झाले आहेत. परिणामी मुंबई बाहेर जाणार्‍या बसेस आता कर्मचार्‍या अभावी आगरात उभ्या असून कित्येक बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. वाहक-चालक अभावी एसटी महामंडळाच्या मुंबई विभागालाच टाळे लागण्याची वेळ आली आहे.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी नुकतीच 3 हजार 307 एसटीच्या वाहक-चालकांची, त्यांच्या इच्छित स्थळी बदली करून त्यांना मोठा सुखद दिलासा दिला आहे. मात्र परिणामी त्यांच्या जागी मुंबई विभागात नवीन वाहक- चालक रुजू करण्याचे नियोजन न झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या मुंबई विभागातील बसेस आगारात उभ्या आहेत. एसटीच्या अनेक मागार्र्वरील बसेस बंद झाल्या आहेत. त्यामुळे हजारो कोटींच्या तोट्यात असलेली एसटी आणखी खड्ड्यात जाण्याच्या मार्गावर आहे. एसटी महामंडळाने या सुट्टीच्या हंगामात एकाही वाहक चालकाला सुट्टी न देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे एसटीचे वाहक- चालक मानसिक दबावात काम करत आहेत.

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या मुंबई विभागात मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरू नगर, परळ, पनवेल आणि उरण असे एकूण पाच आगार आहे. या पाचही आगारात मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचार्‍यांची बदली झाली आहे. ज्यात मुंबई सेंट्रल मध्ये ८५, परळ १९, पनवेल १४, कुर्ला १५ आणि उरण १४ वाहक चालकांच्या समावेश आहे. त्यामुळे मुंबई – नारायणगाव, मुंबई – पाली, मुंबई – हैद्राबाद, मुंबई -पाली, परळ – जळव केंजळवाडी, मुंबई – हुबळी सारखे अनेक एसटीचे मार्ग बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात एसटीचा महसूल बुडत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्न सराईत एसटी महामंडळ दरवर्षी अतिरिक्त बसेस सोडते, मात्र यावर्षी स्वतःचा एसटी महामंडळाकडे वाहक- चालक नसल्याने एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. या संबंधित एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना विचारले असता, त्यांनी मी माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले.

नवीन वाहक – चालकांची प्रतीक्षाच
एसटीत नव्याने निवड झालेल्या उमेदवार या बदली झालेल्या जागी येणार आहेत. मात्र निवड झालेल्या या उमेदवारांचे प्रशिक्षण बाकी आहे. ते प्रशिक्षण पूर्ण करून एसटी महामंडळात रुजू होण्यास जवळ जवळ दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती एसटीच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. मात्र नवीन उमेदवार एसटी रुजू होण्यापूर्वीच सुट्टीचा हंगाम निघून जाणार असल्याने एसटीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

- Advertisement -

बंद झालेले बसमार्ग
मुंबई सेंट्रल आगार
०७.०० मुंबई – नारायणगांव
०७.०० मुंबई – पाली
०९.०० मुंबई – कराड
१०.०० मुंबई – सोलापूर
०५.३० मुंबई – हुबळी [ शिवशाही ] [ चालू बंद ]
मुंबई – अलिबाग [ ६ नियंते बंद ]
मुंबई – भिवंडी [ ६ नियंते बंद ]

परळ आगार
०५. १५ परळ – शिर्डी
०५. ३० परळ – अहमदपूर
०७. १५ परळ – वारुगड
०९. ३० परळ – बेल्हा
१०. ४५ परळ – जळव केंजळवाडी
११. ३० परळ – बाभूळवाडा

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -