घरमुंबईमहानगर इम्पॅक्ट : ‘त्या’ आयसीयू चालकांना काळ्या यादीत टाकणार

महानगर इम्पॅक्ट : ‘त्या’ आयसीयू चालकांना काळ्या यादीत टाकणार

Subscribe

निविदेमधील नियमांची पायमल्ली करणार्‍या खासगी संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे

मुंबई : महापालिकेने उपनगरीय रुग्णालयांतील आयसीयू खासगी संस्थांना चालवायला दिली आहेत. खासगी संस्थांच्या कारभारामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. यामुळे निविदेमधील नियमांची पायमल्ली करणार्‍या खासगी संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘आपलं महानगर’ मध्ये २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

महापालिका रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी भाभा, व्ही.एन. देसाई, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर, सिद्धार्थ रुग्णालय, डॉ. आंबेडकर रुग्णालय, भगवती रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, भाभा रुग्णालय, संत मुक्ताबाई रुग्णालय, मालविया रुग्णालय, फुले रुग्णालय, अग्रवाल रुग्णालय या 12 उपनगरीय रुग्णालयांमधील आयसीयूचे 200 बेड्सचे कंत्राट खासगी संस्थांना देण्यात आले. ६ ऑगस्टपासून खासगी संस्थांनी पालिकेचे आयसीयू आपल्या ताब्यात घेतले. त्यांनतर आयसीयूमध्ये एमबीबीएस डॉक्टरऐवजी बीएमएस, बीएचएमएस डॉक्टरांकडून उपचार करणे, रात्रीच्यावेळी डॉक्टर उपस्थित नसणे अशा तक्रारींमुळे रुग्णांच्या त्रासात भर पडली आहे.

- Advertisement -

mahanagar-Impact-ICU

आयसीयूतील डॉक्टरांचे प्रमाणापत्र तपासणार

आयसीयूचे खासगीकरण केल्याने ७ ऑगस्टनंतर १८ सप्टेंबरपर्यंत घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात ६२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या विरोधात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतची बातमी ‘आपलं महानगर’मध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आयसीयू चालवणार्‍या संस्थांमधील एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र ताब्यात घेण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रमाणपत्र ज्यांची आहेत तेच डॉक्टर सेवा देत आहेत का, यावर लक्ष ठेवण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. त्यानंतरही ज्या संस्था नियमाचा भंग करतील त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. पुढे खासगी संस्था सुधारल्या नाहीत तर त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी दिली.

रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत असल्याने रुग्णांची गर्दी असते. गेल्या काही वर्षात एमडी, एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णाला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पालिकेने आयसीयू खासगी संस्थांना चालवण्यास दिले. आयसीयू खासगीकरणापूर्वी जितक्या रुग्णांचा मृत्यू होत होता तेवढेच प्रमाण सध्याही आहे. खासगी संस्थेच्या डॉक्टरांची प्रमाणपत्रे तपासण्यात येत आहेत. खासगी संस्थेने नियम धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.
– डॉ. विद्या ठाकूर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -