घरमुंबईकसा झाला मराठा आंदोलकांचा ‘मुंबई बंद’? वाचा सविस्तर

कसा झाला मराठा आंदोलकांचा ‘मुंबई बंद’? वाचा सविस्तर

Subscribe

मराठा समाजाने बुधवारी मुंबई बंदची हाक दिली. सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर मराठा समाजाचे बांधव जमा व्हायला सुरुवात झाली होती. सकाळीच पहिलं आंदोलन ठाण्याच्या तीन हात नाक्यावर झालं. आंदोलकांनी टीएमटीची बस फोडून आंदोलनाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ जोगेश्वरीमध्येही रेल रोको करण्यात आलं आणि पुढे हळू हळू मुंबईभर विविध ठिकाणी आंदोलकांनी मुंबई बंदच्या घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी जोरकस पद्धतीने केली.

मराठा आरक्षणासाठी बुधवारी सकाळपासूनच सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मंगळवारपासून राज्यभरात आंदोलन करत असलेल्या मराठा समाजाने बुधवारी मुंबई बंदची हाक दिली. सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर मराठा समाजाचे बांधव जमा व्हायला सुरुवात झाली होती. सकाळीच पहिलं आंदोलन ठाण्याच्या तीन हात नाक्यावर झालं. आंदोलकांनी टीएमटीची बस फोडून आंदोलनाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ जोगेश्वरीमध्येही रेल रोको करण्यात आलं आणि पुढे हळू हळू मुंबईभर विविध ठिकाणी आंदोलकांनी मुंबई बंदच्या घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी जोरकस पद्धतीने केली. मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनात अनुचित प्रकार फारसे घडले नसले, तरी नवी मुंबईत झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कळंबोली, ठाणे आणि कोपर खैरणे परिसरात आंदोलकांनी पोलिसांनी दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तरादाखल आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये काही आंदोलनकर्ते आणि पोलिस कर्मचारीही जखमी झाले. दुपारच्या सुमारास मराठा क्रांची मोर्चा समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतरही समाजातील काही गट आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम होते.

ठाण्यात सकाळी ८ ला बस फोडली

सकाळी आठच्या सुमारास ठाण्याच्या तीन हात नाक्यावर मराठा आंदोलक जमा व्हायला सुरुवात झाली. जमावाने केलेल्या आक्रमक घोषणाबाजीचा परिणाम शेवटी टीएमटीची बस फोडण्यात झाला. यावेळी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बस फोडल्यानंतर आंदोलकांनी तिथेच ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरू केल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

- Advertisement -

सायन-पनवेल मार्ग केला बंद

ठाण्याच्या तीन हात नाक्यावर आंदोलनाचा नारळ फुटल्यानंतर आंदोलनकर्त्यांचा एक गट सायन-पनवेल मार्गावर सक्रिय झाला. या आंदोलकांनी मार्गावर ठिय्या मारत वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बराच काळ सायन-पनवेल महामार्ग ठप्पच होता. मात्र, यादरम्यान घाटकोपर-मानखुर्द रोडवरून वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू होती.

- Advertisement -

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर खोळंबा

ठाणे आणि सायन पनवेलनंतर आंदोलकांनी थेट मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलकडे मोर्चा वळवला. ठाणे स्टेशनवर आंदोलकांनी सीएसटीएमच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी सीएसटीएमकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. याचवेळी काही आंदोलकांनी पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरही रेलरोको केला. त्यामुळे दोन्ही लाईनवर लोकल वाहतूक काही काळ प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईत विविध ठिकाणी आंदोलकांची घोषणाबाजी

एकीकडे काही आंदोलक रेलरोको आणि रास्तारोको करत असतानाच आंदोलकांचे अनेक गट शहरामध्ये विविध ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दादर, परळ, घाटकोपर, दहिसर, बोरिवली, अंधेरी, विलेपार्ले अशा ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दुकानं बंद करायला भाग पाडलं. घाटकोपरमध्ये तर काही आंदोलकांनी थेट मुंडण करून सरकारच्या आरक्षण धोरणांचा निषेध केला.

maratha reservation agitation turn to violent at chembur
मराठा संघटनांचे रस्तारोको

कळंबोली, कोपरखैरणे, ठाण्यात आंदोलन हिंसक

दरम्यान, दुपारच्या सुमारास मुंबई उपनगर आणि नवी मुंबईतल्या काही ठिकाणी आंदोलनाने उग्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. कळंबोलीमध्ये संध्याकाळी उशीरापर्यंत तणावाचं वातारण होतं. अनेक आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत पोलिसांच्या गाड्या जाळल्या. त्यामुळे हिंसक होत असलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. असाच काहीसा प्रकार कोपर खैरणे आणि ठाण्यातही घडला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागली. यामध्ये काही आंदोलक तर काही पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी झाले.

…आणि आंदोलन झालं स्थगित

अखेर दुपारी अडीचच्या सुमारास मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर केलं. ‘आंदोलनामध्ये इतर काही समाजकंटकही कार्यरत झाल्यामुळे आंदोलनाचा गैरफायदा घेतला जाऊ नये, म्हणून आंदोलन स्थगित करत आहोत’ असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, अवघ्या काही वेळातच आंदोलनाचे नवी मुंबईतील समन्वयक विनोद पोखरकर यांनी ‘आमचा स्थगितीला विरोध असेल, आमचं आंदोलन सुरूच राहणार’, असा पवित्रा घेत आंदोलनात नवी आघाडी उघडली. त्यामुळे, आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांमध्येच फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबईतील आंदोलन स्थगित झाल्यानंतरही कळंबोली, कोपरखैरणे आणि ठाण्यात आंदोलक आक्रमक झाले होते. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नक्की आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे की सुरूच राहणार आहे? याविषयी प्रश्नचिन्ह होतं.

राजकीय दावे, दाखले आणि देखावे

एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला असतानाच दुसरीकडे राजकीय स्तरावर मात्र दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नव्हती. कोपरखैरणेमधील आंदोलन तीव्र झाल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार आणि मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारी समितीचे सदस्य नारायण राणे यांनी आरक्षणावर राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याचवेळी आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

Thane Maratha Kranti Morcha
ठाण्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सरकारने पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावला’ असा गंभीर आरोप केला. ‘जातीच्या आधारावर अधिकाऱ्यांच्या कर्तव्य क्षमतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अश्लाघ्य असल्याची’ टीकाही त्यांनी यावेळी केली. या सर्व आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी मात्र ‘हिंसा करू नका, सरकार आंदोलकांशी चर्चेसाठी तयार आहे’ अशीच भूमिका मांडली.

एकंदरीतच बुधवारी दिवसभर महाराष्ट्रात चर्चा होती ती ‘मुंबई बंद’ची! आणि मुंबईत आवाज होता तो मराठा आरक्षणाचा. या आंदोलनादरम्यान शाळा, कॉलेज, भाजीपाला अशा जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोकोदरम्यान अम्ब्युलन्सला जागा करून दिल्याचंही पाहायला मिळालं. मात्र, अनेक ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमुळे या आंदोलनाला गालबोट लागलं.

राज्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आंदोलन चिघळू नये यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आमच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेवरून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -