पाच दिवसांचा आठवडा नको रे बाबा !

वेळ कमी केल्यानंतरही कर्मचार्‍यांमध्ये नाराजी कायमच

bmc
महापालिका

मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबतचा  निर्णय अंतिम टप्प्यात असला तरी विविध कामगार संघटनांनी वाढीव वेळेबाबत उपस्थित केलेल्या मुद्दयामुळे याचा लाभ आता तिसर्‍या शनिवारपासून मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु महापालिका प्रशासनाने देवू केलेल्या पाच दिवसांच्या आठवड्यातील वेळेमुळे आणि कमी होणार्‍या नैमित्तिक रजा पाहता महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी पाच दिवसांचा आठवडा नको रे बाबा असे म्हणत प्रशासनाला हात जोडले. यापेक्षा आहे त्याच आमच्या रजा राहू द्या,असाच सूर कर्मचार्‍यांनी विशेषत: महिलांनी आळवल्यामुळे प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे परिपत्रक महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीकरता सादर करण्यात आले. महापालिकेच्या कर्मचार्‍यांचा कार्यालयीन वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. परंतु पाच दिवसांच्या आठवडा लागू करताना महापालिकेच्या कर्मचार्‍यांना आता ४५ मिनिटे लवकर यावे लागणार आहे आणि ४५ मिनिटे उशिरा थांबावे लागणार होते. सध्याच्या  १५ नैमित्तिक रजांऐवजी आता त्या केवळ ८ रजा करण्यात येणार आहे. म्हणजे ७ रजांना कर्मचार्‍यांना मुकावे लागणार होते. मात्र,हा आठवडा सध्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारची सुट्टीचा लाभ मिळणार्‍या कर्मचार्‍यांनाच लागू असून यामध्ये सध्या शनिवारची सुट्टी नसलेल्या कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळणार नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.

मात्र, यानंतर महापालिकेतील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महापौर,गटनेते तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेवून ही वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहावाजेपर्यंत करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहावाजेपर्यंतची वेळ निश्चित करून नैमित्तिक रजा कमी न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र सध्या साडेदहाच्या ड्युटीला येणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशासनाच्या निर्णयाप्रमाणे सकाळी  दहा वाजता यावे लागणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या आठवड्याबाबत कर्मचार्‍यांमध्येच तीव्र नाराजी पसरली आहे. एवढ्या सकाळी गर्दीतून प्रवास करणे शक्य नसल्याने तसेच शिपाई वर्गाला उशिरापर्यंत थांबावे लागणार असल्याने याबाबत प्रचंड नाराजीचे सूर उमटू लागले आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी कोणतीही मागणी केली तरीही कामगार मात्र, याला तयार नाहीत. यापेक्षा सध्या जी वेळ आणि सुट्टया मिळतात त्या आम्हाला मान्य असून पाच दिवसांचा आठवडा नको,असाच काही सूर आता उघडपणे उमटू लागला आहे. विशेषत: महिला कर्मचार्‍यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा नको रे बाबा असेच म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान महापालिका चिटणीस विभागातील शिपायांनीही वाढीव वेळेबाबत गटनेत्यांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या शनिवारी लागू होणारा पाच दिवसांचा आठवडा आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. गटनेत्यांच्या सभेत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेण्याची तयारी दर्शवली असली तरी कामगारच तयार नसल्याने आयुक्तांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर तुर्तास तरी कोणता निर्णय न घेण्याचा पावित्रा घेतला असल्याचे समजते.

समिती घेणार सुट्टयांचा निर्णय

महापालिकेच्या कर्मचार्‍यांना पाच दिवसांच्या आठवड्याचा लाभ देताना सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा ऐवजी कामगार संघटना व गटनेत्यांच्या मान्यतेने सकाळी दहा ते सायंकाळी अशी वेळ करण्यात आली आहे. तसेच १५ नैमित्तिक रजा कमी न करता कायम ठेवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या रजा कमी करण्याबाबत सातवा वेतन आयोगाच्या समितीपुढे निर्णय होणार असून त्यामध्ये भविष्यात या रजा कमी केल्या जाण्याची शक्यता आहे.