एमडीआर टीबी रुग्णांना आता इंजेक्शन घेण्याची गरज नाही- डब्लूएचओ

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने दिलेल्या अहवालानुसार, नव्या संशोधनातून एमडीआर टीबी रुग्णांना आता यापुढे इंजेक्शन घेण्याची गरज नाही.

TB patients
प्रातिनिधिक फोटो

टीबी रुग्णांना दर दिवशी कमरेच्या खाली स्नायूंमध्ये इंजेक्शन दिले जातात. पण, जेवण वेळेवर नसल्यामुळे आणि कमी झालेल्या वजनामुळे या रुग्णांना ही इंजेक्शन्स झेपण्यासारखी नसतात. त्यामुळे, आता डब्लूएचओने दिलेल्या निर्णयानुसार टीबी रुग्णांना देण्यात येणारी इंजेक्शन्स आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे इंजेक्शन घेण्याची गरज नाही

एमडीआर टीबी असलेल्या रुग्णांना जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत अनेकदा उपचार घ्यावे लागतात. जसजसे विज्ञान-तंत्रज्ञान पुढे जातंय तसतसे टीबी रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये ही बदल केले जात आहेत. पण, सतत औषधं आणि इंजेक्शन घेतल्यामुळे एमडीआर टीबीचे रुग्ण उपचार अर्धवट सोडून मृत्यूला कवटाळतात. त्यातच एमडीआर टीबी बरं होण्याचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पण, आता एमडीआर लेवलचा टीबी असणाऱ्या रुग्णांना इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

तोंडावाटे गोळ्या, औषधं घेण्याचं प्रमाण जास्त

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने दिलेल्या अहवालानुसार, नव्या संशोधनातून टीबी रुग्णांना आता यापुढे इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही. एमडीआर टीबी रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेजिम म्हणजेच गोळ्यांच्या समुहामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यात तोंडावाटे गोळ्या, औषधं घेण्याचं प्रमाण जास्त आहे. या बदललेल्या रेजिमची म्हणजेच औषधांचा परिणाम आणि रुग्णाला पडलेला फरक बघूनच या नव्या उपचारपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या नव्या उपचार पद्धतीत तोंडी घेण्याच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १७ ऑगस्ट २०१८ ला हा नवा बदल करण्यात आला आहे.

“एमडीआर टीबी रुग्णांच्या रेजिममध्ये जे बदल करण्यात आले आहेत, त्याचा अवलंब आधी दुसऱ्या राष्ट्रांच्या रुग्णांवर करण्यात आला होता. तिथल्या रुग्णांना आलेला फरक पाहूनच जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. कोक्रेन नावाचं एक स्टॅटिस्टिकल यंत्र आहे. त्यावरुन कोणत्या ड्रग्जचा परिणाम लवकर एमडीआर टीबी रुग्णांना होतो हे पाहण्यात आलं आहे. एका रेजिममध्ये ५ ते ६ ड्ग्ज रुग्णाला दिले जातात. त्यात सतत इंजेक्शन्ससोबत गोळ्या दिल्या जायच्या. आता त्याचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील जी चांगली औषधं आहेत ती आता शोधून काढली आहे. त्यात बिडाक्युलिनचा देखील समावेश आहे. २०१८ च्या शेवटपर्यंत नव्या उपचारपद्धतीचा अवलंब केला जाईल.” – डॉ. राजेंद्र ननावरे, वैद्यकीय सल्लागार, इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरकुलोसिस अँड लंग डिसिस

अनेक रुग्ण मध्येच औषधोपचार सोडून देतात 

३० आणि ३५ वयोगटातील लोकांना हल्ली टीबी होण्याचे प्रमाण जास्त आहे. सतत इंजेक्शन घेतल्यामुळे लोकं डिप्रेशनमध्ये जातात. शिवाय, औषधोपचार सोडून देतात. या सर्व गोष्टींचा विचार करुन जागतिक आरोग्य संघटनेच्या कोर कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार, औषधोपचारातून इंजेक्शन्स आता काढून टाकण्यात येणार आहेत. ही नवी उपचार पद्धती अवलंबली जाणार आहे, असं ही डॉ. ननावरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच शॉर्ट कोर्स रेजिम पद्धती देखील आली आहे. म्हणजेच, काही एमडीआर टीबी रुग्णांना २४ महिन्यांऐवजी आता ९ ते १२ महिन्यांपर्यंतची रेजिम आली आहे. त्याचा फायदा टीबी रुग्णांना होऊ शकतो. २०१८ च्या १६ ते २० तारखेदरम्यान गाईडलाईन कमिटीची बैठक झाली होती. त्यात २६ देशातील सदस्यांचा समावेश होता . या बैठकीत १२ हजार रुग्णांचा रेकॉर्ड आणि दिर्घकाळापासून असणाऱ्या ५० एमडीआर रुग्णांच्या केस स्टडीज होत्या. त्यात सादर झालेल्या अहवालानुसार, केनामायसिन आणि कॅप्रिओमायसिन हे दोन इंजेक्शन्स वगळण्यात आली आहे.