घरमुंबईमुलुंडच्या अगरवाल रुग्णालयाच्या भूमिपूजनात भाजपापूर्वी मनसेने वाढवले श्रीफळ!

मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयाच्या भूमिपूजनात भाजपापूर्वी मनसेने वाढवले श्रीफळ!

Subscribe

भाजप- शिवसेनेच्यावतीने या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा श्रीफळ नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्याहस्ते वाढवण्याचा कार्यक्रम मंगळवारी घेतला होता. मात्र युतीच्या कार्यक्रमापूर्वीच मनसेने त्याठिकाणी कुदळ मारत भूमिपूजनाचा बार उडवून दिला.

मुलुंडमध्ये मागील अनेक वर्षांपासून निविदेतच अडकलेल्या महापालिकेच्या एम.टी.अगरवाल रुग्णालयासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यानंतर या कामाच्या भूमिपूजनावरून मंगळवारी भाजप-शिवसेना आणि मनसेत जुंपली. भाजप- शिवसेनेच्यावतीने या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा श्रीफळ नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्याहस्ते वाढवण्याचा कार्यक्रम मंगळवारी घेतला होता. मात्र युतीच्या कार्यक्रमापूर्वीच मनसेने त्याठिकाणी कुदळ मारत भूमिपूजनाचा बार उडवून दिला. त्यामुळे या रुग्णालयाच्या बांधकामांवरून भाजप आणि मनसेत श्रेयवाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

आधी मनसे, मग भाजप

भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुलुंड पश्चिम येथील एम.टी. रुग्णालयाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थानिक भाजप नगरसेविका समिता कांबळे यांनी आयोजित केला होता. परंतु सकाळी नऊ वाजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करीत या रुग्णालयाचे भूमिपूजन आटोपून घेतले. त्यानंतर पुन्हा अकरा वाजता खासदार मनोज कोटक, भाजपचे सर्व नगरसेवक आणि शिवसेना विभागप्रमुख व नगरसेवक रमेश कोरगावकर यांच्या हस्ते देखील पुन्हा एकदा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.

- Advertisement -

प्रकाश गंगाधरेंचं उपोषण आणि निविदा प्रक्रिया!

मुलुंड ते भांडुप परिसरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे रुग्णालय धोकादायक झाल्यामुळे त्याचे पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. परंतु याची निविदा मागवल्यानंतर दोन ते तीन वेळा अंदाजित रकमेपेक्षा अधिक दराने निविदा आल्याने फेरनिविदा मागवण्यात आल्या. परंतु खासगी रुग्णालयांना लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका प्रशासन हेतुपुरस्सर याची निविदा काढत नसल्याचा आरोप करत तत्कालीन स्थानिक भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मुलुंड स्थानकाबाहेरच आमरण उपोषण पुकारले होते. या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर निविदा मागवून कंत्राटदाराची निवड केली. याला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर आचारसंहितेमुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकणार्‍या भाजपच्या विद्यमान स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी नवनिर्वाचित खासदारांच्या हस्ते याचे श्रीफळ वाढवून घेतले.

‘भाजपने प्रोटोकॉल पाळला नाही’

भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी या भूमिपूजनाच्या वेळी बोलताना, ‘या कार्यक्रमाचे मनसेच्या पदाधिकार्‍यांना देखील निमंत्रण होते. ते आले असते तर आम्ही एका नारळ त्यांच्या हस्ते देखील वाढविला असता. या रुग्णालयाचा संपूर्ण पूर्व उपनगराला फायदा होणार असून जर कोणाला या बाबत काही सूचना करायचा असतील तर त्यांनी इथल्या भाजपच्या नगरसेवकांकडे ते करू शकतात’, असे सांगितले. तर मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण म्हणाले कि, ‘नगरसेविका समिता कांबळे यांच्या या रुग्णालयाच्या पाठपुराव्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी कधीही पाठपुराव्याबाबत आमच्याबरोबर खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी, असे आमचे आव्हान आहे. हा भूमीपूजन सोहळा शासकीय कार्यक्रम नसून तो त्यांचा वैयक्तिक आहे. यांनी कुठेच शासकीय प्रोटोकॉल पाळलेले नाहीत. म्हणून आम्हीच नागरिकांच्यावतीने प्रथम येथे भूमिपूजन केले’, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -