घरमुंबई70हून अधिक सभासदांना मतदान हक्कापासून डावलले

70हून अधिक सभासदांना मतदान हक्कापासून डावलले

Subscribe

ठाण्यातील सर्वात जुने 125 वर्षाची परंपरा असलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे याची व्यवस्थापक मंडळ आणि विश्वस्त मंडळाची निवडणूक रविवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीकरिता विद्यमान मंडळाचे पॅनल आणि परिवर्तन पॅनल अशा दोन गटात हि निवडणूक होणार आहे. मात्र विद्यमान मंडळाने परिवर्तन मंडळाला दिलेल्या सभासदांच्या यादीमधून अनेक सभासदांची नावे गाळण्यात आल्याने परिवर्तन पॅनलने संताप व्यक्त केला आहे. यामुळे आता ही निवडणूक वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी ग्रंथसंग्रहालयाची सदस्यसंख्या सुमारे 2500 आहे. मात्र मतांचा अधिकार केवळ 5 टक्के सभासदच बजावतात. त्यातही या सक्रीय पाच टक्के सभासदांमधून सुमारे 70 हून अधिक सभासदांना विद्यमान मंडळाने बाद करून त्यांचा मतांचा अधिकार हिरावून घेतला आहे. 31 डिसेंबरपर्यंत ज्या सभासदांची नोंदणी झाली आहे. ज्यांच्याकडे तसे सभासदकार्ड आहे त्यांना या निवडणुकीत मत देण्याचा अधिकार आहे. मात्र विद्यमान मंडळाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर या सभासदांची नोंदणी दिनांक बदलून 2 जानेवारी असल्याचे सांगून त्यांना या निवडणूक प्रक्रियेतून बाद केले आहे. याबाबत त्यांनी विद्यमान विश्वस्तांकडे विचारणा केली असता तुमच्या सभासद नोंदणीचा दिनांक चुकला असल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे या सभासदांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

- Advertisement -

याशिवाय दोन वर्षापूर्वी अधिकृतरित्या सभासद नोंदणी करून क्रमांक 1749 देण्यात आला. ते सभासद महेश ठाकूर जेव्हा निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रीय भाग घेण्यासाठी आले तेव्हा तुमचा सभासद क्रमांक आणि दुसर्‍या व्यक्तीचा सभासद क्रमांक सारखा असल्याने तुम्हाला या निवडणूक प्रक्रियेतून बाद करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. मागील दोन वर्षात कधीही हा सभासद क्रमांक चुकीचा आहे अथवा दुसर्‍या कुणालाही देण्यात आला आहे, याबद्दल काहीही कळवण्यात आले नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या कार्यकाळात त्यांना बाद करण्यात आले. हा अनागोंदी कारभार अनैतिक मार्गाने निवडणुक जिंकण्यासाठीच केला जात असल्याचा आरोप अनेक सभासद करीत आहेत. याबाबत निवडणूक निर्वाचन अधिकार्‍यांकडे लिखीत तक्रार दाखल करण्यात आली असून तिथे न्याय न मिळाल्यास याबाबत रितसर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा या सभासदांनी दिला आहे.

मागील वर्षी ग्रंथ संग्रहालयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे शुल्क वाढवून येथे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला होता. त्यावेळी देखील ग्रंथालयाच्या कारभारावर टिका करण्यात आली होती. या शिवाय ग्रंथपाल पदासाठी करण्यात आलेल्या नियुक्तीवरून देखील असाच वाद निर्माण झाला होता. 2500 इतकी सभासद संख्या असतानाही ग्रंथालयाच्या एकाही कार्यक्रमाला 50 अधिक मंडळी उपस्थित नसतात यावरून विद्यमान मंडळाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याबाबत लवकरच ठोस पावले उचलली जातील असा इशाराही वगळण्यात आलेल्या सभासदांनी दिला आहे.

- Advertisement -

मागील निवडणुकीत विद्यमान विश्वस्त मंडळ केवळ 125च्या फरकाने निवडून आले. त्यामुळे ही 70 मते अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. म्हणूनच त्यांना बाद करण्यासाठी आपलीच चूक झाली, असे कबूल करून त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याची ही बाब अत्यंत गंभीर असून या विरोधात सर्वच सभासदांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. – महेश ठाकूर, सभासद, मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे

महेश ठाकूर यांच्याबाबत झालेला प्रकार चुकीचा असून त्याबाबत विद्यमान मंडळाला आपली चूक सुधारण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय या कारणाने त्यांना या निवडणूक प्रक्रियेतून बाद करता येणार नाही. त्याचे सभासदत्व वैद्य असून ते या निवडणुकीत सहभाग घेऊ शकतात. उर्वरित 70 सभासदांबद्दलही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल. – सदानंद जोशी , निवडणूक निर्वाचन अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -