पोलिसाच्या बायकोने गळा चिरून मुलीची केली हत्या, नंतर स्वत: केली आत्महत्या!

Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river
Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river

मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई अशोक पाटील यांच्या पत्नीने ७ वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शिरगाव येथे घडली.या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी मृत महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिनाबाई (३०), कीर्तिका (७) असे मृतांची नावे आहेत. मिनाबाई यांचे पती अशोक पाटील हे मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई असून देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी दिली.  पोलीस शिपाई अशोक पाटील हे बदलापूर, शिरगाव येथील शुभम करोती अपार्टमेंट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आई, पत्नी आणि मुलगी किर्तीका सोबत राहण्यास होते. अशोक पाटील हे सकाळीच मुंबईत कामासाठी निघून गेले होते, दरम्यान  रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मिनाबाई यांच्या खोलीतून किर्तीका या चिमुरडीला ओरडण्याचा आवाज आल्यामुळे अशोक पाटील यांच्या आईने मिनाबाईच्या खोलीकडे धाव घेतली असता सून मिनाबाई आणि नात किर्तीका या दोघी रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत पडल्या होत्या. अशोक पाटील यांच्या आईने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. काही वेळाने बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि जखमी मायलेकीला उपचारासाठी स्थानिक रुग्णलायत आणले मात्र तत्पूर्वीच दोघीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान दिवसपाळीला कामावर गेलेले पोलीस शिपाई अशोक पाटील कामावरून परतले असता त्यांना ही घटना कळताच धक्काच बसला असून अद्यापही ते या धक्क्यातून सावरले नसल्याचे बदलापूर पोलिसानी म्हटले आहे.

मिनाबाई यांनी मुलीची निर्घृण हत्या करून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या का केली या बाबत अद्याप काहीही स्पष्ट कारण कळू शकलेले नसल्याची माहिती सपोनि. कुलकर्णी यांनी दिली. याप्रकरणी मृत मिनाबाई हिच्यावरुद्ध मुलीची हत्या केल्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी सांगितले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बदलापुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


हे ही वाचा – निर्दयी! पर्यटकांच्या सेल्फीसाठी बछड्याचे पायच तोडले!