घरमुंबईएमपीएससी निर्णयात कमी पडले

एमपीएससी निर्णयात कमी पडले

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

एमपीएससी प्रकरणी राजकारण करणे योग्य नाही. पूर्व परीक्षेचे प्रकरण हाताळण्यात एमपीएससी कमी पडले, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पोहोचले होते. विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच केंद्राच्या पथकातील सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले.

एमपीएससी परीक्षेच्या गोंधळावर बोलताना अजित पवार म्हणाले की, यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे. मात्र, सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न झाला. त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. यावेळी त्यांनी आपण स्वत: यामध्ये लक्ष घातल्याचे सांगितले. त्यांनी एमपीएससीला सांगून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वातावरण अशा पद्धतीने खराब करणे योग्य नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

जर पूर्वनियोजित सगळे ठरले होते तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली असे विचारण्यात आले असता अजित पवार म्हणाले की, मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, झालो की याचे उत्तर देईन. मी पहिल्यांदाच सांगितले की एमपीएससीने हे सर्व करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला हवे होते. एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडले हे माझे, स्पष्ट वैयक्तिक मत आहे.

राज्याचे प्रमुख बोलले आहेत. आम्ही प्रमुखांच्या हाताखाली काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी निर्णय दिल्यानंतर त्याची अमलबजावणी करण्याचे काम सरकारकडून केले जाईल आणि आमचा पाठिंबा राहील, असे अजित पवारांनी सांगितले. झालं ती दुर्दैवी घटना म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे, असे अजित पवारांनी सांगितले.

- Advertisement -

सरकारी भरतीसाठी धोरण ठरवावे –सत्यजित तांबे
२१ मार्चला एमपीएससीची परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी स्वागत केले आहे. सर्व प्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण आणि पारदर्शक प्रक्रिया जाहीर करून संभ्रमावस्था दूर करावी. तसेच २१ मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.

एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला
लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलण्यात आली होती. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शनिवारी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. यानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -