घरमुंबईबुलेट ट्रेनखाली वनक्षेत्र चक्काचूर

बुलेट ट्रेनखाली वनक्षेत्र चक्काचूर

Subscribe

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे एकीकडे बळीराजाची जमीन मोठ्या प्रमाणात बळकावली जात असतानाच दुसरीकडे वनक्षेत्राचा परिसरही नष्ट होणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना याचा सगळ्यात जास्त फटका बसणार असून या दोन्ही जिल्ह्यांतील हिरव्यागार वनक्षेत्रावर बुलेट ट्रेनचा गतीमान वरवंटा फिरणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.

ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने केंद्र आणि राज्य सरकारनेही तो पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून या प्रकल्पाची अंमलबजावणी होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्यात तीव्र विरोध होत आहे. मात्र भाजपनेही बुलेट ट्रेन प्रकल्प प्रतिष्ठेचा केला आहे. या प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ७७.४५ हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. त्यामध्ये १८.८९ हेक्टर खारफुटी क्षेत्राचा समावेश असून ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्राचा समावेश आहे. तसेच ठाणे खाडी आणि उल्हासनदीच्या तीन टप्प्यांमधून हा मार्ग जाणार आहे. त्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात नष्ट होणार आहे.

- Advertisement -

नद्या, नाले, तलाव, अभयारण्यावर वरवंटा

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली या तीनही ठिकाणांहून ८६६.१३ हेक्टर जमिनीवरून बुलेट ट्रेनचा प्रवास होणार आहे. बुलेट ट्रेनच्या एकूण मार्गापैकी ७६.७४ टक्के मार्ग शेतजमिनीतून जात आहे. यातील ३.०२ टक्के जमिनीवर वनक्षेत्र आहे. तर २.५३ टक्के जमिनीवर पाणीसाठा आहे. नद्या, नाले आणि खाडी या जलस्त्रोतांची संख्या ३४ च्या आसपास आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्य प्राणी अभयारण्य आणि ठाणे खाडी परिसरातील फ्लेमिंगो अभयारण्यालगतच्या भागातून हा मार्ग जाणार आहे. बुलेट ट्रेनमुळे मोठ्याप्रमाणात वनक्षेत्र नष्ट होणार आहे. या प्रकल्पातील पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यांच्या परिणामांचा अभ्यास प्रशासनाकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

ठाणे खाडीखालून बोगदा

या प्रकल्पात भुयारी मार्गाचा समावेश असून एकूण आठ बोगदे आहेत. ठाणे खाडीच्या खालून जाणारा बोगदा सर्वाधिक लांब २०.७१ किमी असून, ३० मीटर खोल अंतरावरून जाणार आहे. हा मार्ग मिठी नदी, ठाणे खाडी, उल्हास नदीच्या वेगवेगळ्या पात्रांतून जाणार असल्याने मोठ्या प्रमाणावर खारफुटीची कत्तलही केली जाणार आहे.

- Advertisement -

दोन तासात मुंबई-अहमदाबाद

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जायका या जपानी कंपनीकडून तयार करण्यात येणार आहे. ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट ट्रेन साधारण दोन तासात मुंबई-अहमदाबाद हे अंतर पार करेल. सध्या इतर ट्रेनने हे अंतर पार करण्यासाठी सात तास, तर विमानाने एक तास वेळ लागतो. बुलेट ट्रेनसाठी बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद या मार्गावर १२ स्थानके असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -