घरमुंबईनिरुपमांच्या कार्यक्रमातून देवरा गायब! मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी सुरूच!

निरुपमांच्या कार्यक्रमातून देवरा गायब! मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी सुरूच!

Subscribe

मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून संजय निरूपम यांनी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात प्रत्यक्ष मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांचाच फोटो गायब असल्याचं रविवारी पाहायला मिळालं.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा विराजमान झाले असून संजय निरूपम यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेली, पक्षश्रेष्ठींनी या दोघांमध्ये ‘शांतता समेट’ घडवून आणल्याचं बोललं जात होतं. मात्र, रविवारी मुंबईत झालेल्या संजय निरूपम यांच्या एका जाहीर कार्यक्रमातून देवरा-निरूपम गटामधली सुंदोपसुंदी अद्याप कायम असल्याचंच पाहायला मिळालं. त्यामुळे स्वत: राहुल गांधींनी मुंबईत झालेल्या सभेमध्ये मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरल्याचंच दिसून आलं.

Milind Deora and Sanjay Nirupam
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आणि संजय निरुपम

मुंबई अध्यक्षांचाच फोटो नाही!

रविवारी संध्याकाळी काँग्रेस उमेदवार संजय निरूपम यांनी अंधेरीमध्ये युथ काँग्रेसचं युवा संमेलन आयोजित केलं होतं. यावेळी अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर तसेच पाटीदार समाजाता नेता हार्दिक पटेल उपस्थित होते. मात्र, मुंबईत काँग्रेसचा कार्यक्रम आयोजित असताना या कार्यक्रमाच्या पोस्टरवरून मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे फोटोच गायब होते. एवढंच काय, तर काँग्रेसच्या राज्यातल्या कोणत्याही नेत्याचे फोटो या पोस्टरवर नव्हते. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधली गटबाजी अद्याप संपली नसल्याचीच चर्चा कार्यक्रम स्थळी होत होती.

- Advertisement -

नगरमध्ये देखील वाद सुरूच

दरम्यान, शनिवारी अहमदनगरमध्ये झालेल्या प्रचारादरम्यान विखे पाटील आणि थोरात यांच्या गटांमध्ये मतैक्य नसल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या प्रचार पोस्टर्सवरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला होता. त्यामुळे नगरमध्ये अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसत असतानाच आता मुंबईतल्या गटबाजीने देखील डोकं वर काढल्याचं दिसू लागलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -